News Flash

आठवड्याचा लॉकडाउन परिणामकारक नाही; केंद्राने महाराष्ट्राला दिला होता सल्ला

शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत राज्यात असणार संपूर्ण लॉकडाउन

राज्यात आठवड्यातील दोन दिवस लॉकडाउन असणार आहे.

प्रचंड वेगानं होत असलेलं करोनाचं संक्रमण आणि वाढत्या रुग्णसंख्येला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. हे निर्बंध मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून लागू झाले आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी आणि आठवड्याच्या शेवटी संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटी दोन दिवस असणाऱ्या लॉकडाउनची करोना रोखण्यास फार मदत होणार नसल्याचा सल्ला केंद्रानं महाराष्ट्राला दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या सचिवांना याबद्दल सूचना केल्या होत्या, अशी माहिती आता समोर आली आहे.

एका अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना याविषयीची माहिती दिली. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या एका बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबद्दल सूचना केल्या होत्या. “केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची उच्च स्तरीय बैठक झाली होती. या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांना बोलण्यासाठी भरपूर वेळ देण्यात आला होता. त्यावेळी आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन लावण्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नव्हती,” अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

१५ मार्च रोजी राज्यात १६ हजार ६२० नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्रही पाठवलं होतं. ज्यात लॉकडाउन न लावता कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्याची सूचना केली होती. “नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन यासारखे उपाय संक्रमण रोखण्यात फार प्रभावी नाहीत. त्याऐवजी जिल्हा पातळीवरील प्रशासनाने कंटेनमेंट उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर द्यायला हवा,” असं भूषण यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेलं होतं.

राज्यात कडक निर्बंध आणि आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन लागू करण्याचा निर्णयावर बद्दलही माहिती दिली. “आरोग्य विभागाच्या अभ्यासानंतर लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असतानाही करोना नियमावलीचं पालन करण्यात लोक उदासीन दिसत आहेत. लोकांकडून सहकार्य केलं जात नाही,” असंही या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

“वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पायाभूत सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेवर येणाऱ्या ताणाबद्दल अंदाज लावण्यात आला. दोन मुद्द्यांवर राज्यातील भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला. यात बेड्सची संख्या आणि पुरेसा ऑक्सिजन. त्यात तज्ज्ञांनी असं सांगितलं की, ही रुग्णवाढ याच वेगाने होत राहिली, तर १७ एप्रिलपर्यंत आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येईल,” अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

महाराष्ट्रासह तीन राज्यात ५० पथकं

देशातील वाढत्या रुग्णसंख्येनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल रोजी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर रविवारी झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी कोविड प्रभावित राज्यांमध्ये तज्ज्ञांची केंद्रीय पथके पाठवण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे केंद्राने ५० पथकं तयार करून ती महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाबमध्ये पाठवण्यात आलेली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 9:42 am

Web Title: break the chain weekend lockdown in maharashtra weekend lockdowns do not work centre told maharashtra bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Video :’माझ्या वडिलांना सोडा’, नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या कोब्रा कमांडोच्या निरागस मुलीची आर्त हाक
2 धक्कादायक! कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला व्हेंटिलेटरचा पुरवठा
3 छत्तीसगड नक्षलवादी हल्ला, बेपत्ता कोब्रा कमांडोचं नक्षलवाद्यांकडून अपहरण?
Just Now!
X