नव्या अभ्यासाचा निष्कर्ष

स्तनांच्या कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत महिलांना किमोथेरपीची (रासायनिक द्रव्यांद्वारे उपचार) गरज नसल्याचे नव्या अभ्यासात लक्षात आले असून त्याने कर्करोगाच्या उपचारपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होण्याचे संकेत दिसत आहेत.

अमेरिकेतील व्हॅंडरबिल्ट विद्यापीठाच्या वैद्यकीय केंद्रातील डॉ. इन्ग्रिड ए. मेयर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या गटाने २००६ सालापासून टेलरएक्स नावाने हा अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष शिकागो येथे अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल आँकोलॉजीच्या बैठकीत रविवारी मांडण्यात आले. हे निष्कर्ष द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध होत आहेत. २०१६ सालानंतर त्याला जिनॉमिक हेल्थ नावाच्या कंपनीने मदत केली. अभ्यासात १०,२५३ महिलांची पाहणी करण्यात आली. त्यातून किमोथेरपीच्या तुलनेत एंडोक्राइन थेरपीचे महत्त्व अधोरेखित झाले.

ही उपचारपद्धती अत्यंत प्रभावी आहे. त्याने कर्करोगावरील उपचारांची पद्धत बदलेल. ज्याचा फायदा होत नाही अशा विषारी द्रव्यांनी उपचार होण्यापासून आपण हजारो महिलांना वाचवू शकू, असे डॉ. मेयर यांनी म्हटले.

यासंबंधीच्या अभ्यासात असे दिसून आले की, रुग्णाच्या टय़ूमरची जनुक चाचणी केली असता त्यापैकी कोणत्या रुग्णांना किमोथेरपी दिली नाही तरी चालेल हे लक्षात येते. त्यांना शरीरातील एस्ट्रोजेन हे संप्रेरक तयार करणारी प्रक्रिया बंद करणारे एकच औषध देता येऊ शकते. अशा संप्रेरकाचे कार्य थांबवणारे टॅमॉक्झिफेन हे औषध आणि तशा अन्य औषधांना एंडोक्राइन थेरपी म्हणतात. या उपचारांनी कर्करोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता घटते, स्तनांत नवे टय़ूमर तयार होण्याची शक्यता कमी होते आणि मृत्यूचे प्रमाण कमी होते. त्यामुळे एंडोक्राइन थेरपी आता कर्करोगाच्या उपचारपद्धतीत महत्त्वाची भूमिका बजावू लागली आहे.

किमोथेरपीची दहशत.

किमोथेरपीने रुग्ण वाचतात. पण तिचे दुष्परिणामही आहेत. त्याने केस गळणे, वासना उडणे, हृदय आणि चेतापेशींना इजा होणे आदी परिणाम होतात. त्याने रुग्णाला जंतुसंसर्ग आणि उतारवयात ल्युकेमिया होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे किमोथेरपी टाळण्याची गरज आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून टेलरएक्स हा अभ्यास करण्यात आला.