नरेंद्र मोदी यांनी या विजयाने केवळ गुजरातमधीलच नव्हे, तर केंद्रीय राजकारणालाही गती दिली आहे. एकीकडे, मोदींच्या विजयाबद्दल दिल्लीसह देशभर भाजपचा जल्लोष सुरू होता. तर दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतील भाजपची आकडेवारी १२५च्या पुढे गेल्यास त्यांना रोखणे कठीण होईल, या भावनेने पक्षाच्या वरिष्ठ गोटात अस्वस्थता होती. मात्र, मोदींचे संख्याबळ घटून ११५ झाल्याची बातमी येताच त्यांच्या विरोधातील भाजप नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. भाजप आणि मोदींना ११७ च्या आत रोखणे हेही काँग्रेससाठी विजयापेक्षा कमी नव्हे, असे अंतिम निकाल हाती येण्यापूर्वीच जाहीर करणारे अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनाही हायसे वाटले.
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी आणि अरुण जेटली यांनी मोदींचे अभिनंदन केले. तसेच मोदी यांचे कट्टर समर्थक राम जेठमलानी आणि स्मृती इराणी या राज्यसभा सदस्यांनी मोदी पंतप्रधानपदासाठी पात्र असल्याचे मत व्यक्त केले. लोकप्रियता वाढलेल्या मोदींना कसे रोखावे या विवंचनेत भाजप नेत्यांप्रमाणेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल हा मित्रपक्षही सापडला आहे. धर्मनिरपेक्ष देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याची धर्मनिरपेक्षताही सिद्ध व्हायला हवी, असा टोला जदयूचे खासदार अली अन्वर यांनी लगावला. एका विजयामुळे मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे गुजरातचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी मात्र या विजयासाठी मोदींचे खिलाडूपणे अभिनंदन केले.