मागच्या दोन महिन्यात आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ सुरु होती. त्यामुळे दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत होत्या. ज्याचा नकारात्मक परिणाम भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर होत होता. पण आता अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये घसरण सुरु झाली आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय तेल बाजारात प्रति तेल पिंपाचा दर ६९ डॉलरपेक्षा कमी झाला आहे. सहाजिकच यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये आणखी कपात अपेक्षित असून महागाई देखील नियंत्रणात येईल. भारतात तर प्रतिलिटर पेट्रोल ९१ रुपयांपर्यंत पोहोचले होते. पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे जनसामन्यांमधील ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारला कर कपात करुन नागरिकांना दिलासा द्यावा लागला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओपेकला तेल पुरवठयामध्ये कपात करु नका असे आवाहन केले आहे. ओपेक ही जगातील तेल पुरवठादार देशांची संघटना आहे. ओपेकमधील प्रमुख तेल निर्यातदार सौदी अरेबियाने डिसेंबर महिन्यात तेल पुरवठयामध्ये कपात करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना हे आवाहन करावे लागले. सौदी अरेबियाने मनमानी केली तर त्यांचे अमेरिकेबरोबर संबंध आणखी बिघडू शकतात. अमेरिकेने इराणवर निर्बंध लावले आहेत. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतींमुळे अमेरिकेला भारतासह अन्य सात देशांना इराणकडून तेल खरेदीची नाईलाजाने परवानगी द्यावी लागली आहे.