अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी नामांकन दिलेले ब्रेट कावनॉग यांची सिनेटच्या समितीसमोर होणारी सुनावणी लांबणीवर टाकली आहे. त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणारी महिला ख्रिस्तीन ब्लॅसी फोर्ड हिने समितीसमोर साक्ष देण्यास नकार दिला आहे.

सिनेटर चक ग्रॅसली हे सिनेटच्या न्याय समितीचे अध्यक्ष असून त्यांनी शुक्रवारी सांगितले, की कावनॉग व त्यांच्यावर आरोप करणाऱ्या  महिला डॉ. फोर्ड यांना सोमवारी सुनावणीसाठी बोलावले होते. त्यात कावनॉग यांनी सुनावणीस उपस्थित राहण्यास होकार दिला पण पालो अल्टो येथे क्लिनिकल सायकॉलॉजी प्राध्यापक असलेल्या फोर्ड यांनी सुनावणीस उपस्थित राहण्यास नकार दिला.

ग्रॅसली यांनी कावनॉग यांना सांगितले होते की, शुक्रवारी रात्री दहापर्यंत याबाबत होकार किंवा नकार कळवावा. तसे केले नाही तर सिनेटची न्याय विषयक समिती त्यांच्या न्यायाधीशपदी नेमणुकीवर मतदान घेईल. फोर्ड यांच्या वकिलाने काहीच उत्तर न दिल्याने किंवा त्याना जाबजबाबास उपस्थित राहायचे नसल्याने त्यांना आता मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यामुळे सुनावणी लांबणीवर टाकण्यात येत आहे. पण सतत अशी सुनावणी लांबणीवर टाकली जाणार नाही. डॉ. फोर्ड यांची साक्ष आम्हाला महत्त्वाची वाटते. आता त्यांना सोमवापर्यंत मुदत देण्यात येत आहे. बाहेरचा वकील समितीच्या कामकाजात अटी घालू शकत नाही असे सिनेट समितीने फोर्ड यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

आरोपीला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. न्या. कावनॉग हे प्रसारमाध्यमात  करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देणे लागत नाहीत. यात डॉ. फोर्ड यांचे म्हणणेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानतंरच याबाबत निर्णय घेता येईल असे पत्रात म्हटले आहे.

ट्रम्प यांनी कावनॉग यांना पाठिंबा कायम ठेवला असून डेमोक्रॅट पक्षाने हा मुद्दा का उपस्थित केला हे समजत नाही असे म्हटले आहे. ३६ वर्षांपूर्वी लैंगिक हल्ला झाल्याचे डॉ. फोर्ड यांचे म्हणणे आहे मग त्यांनी तेव्हाच पोलिसात तक्रार का दिली नाही, असा सवाल ट्रम्प यानी केला.

कावनॉग यांनी १९८० मध्ये शाळेत असताना आपल्यावर लैंगिक हल्ला केला होता, असा आरोप फोर्ड यांनी दी वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना केला होता. या प्रकरणी एफबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.