लंडन : युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याच्या ‘ब्रेग्झिट’ योजनेची योग्य आखणी आणि मांडणी करण्याचे कारण देत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी १३ ऑक्टोबपर्यंत संसद संस्थगित केली आहे.

ब्रेग्झिटच्या विरोधात जे खासदार आहेत त्यांना आपली बाजू मांडायला अवधी मिळू नये आणि जॉन्सन यांना त्यांच्या सोयीचा मसुदा पुढे रेटता यावा, यासाठी ही धडपड केली गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

युरोपीय मंडळाची बैठक १७ आणि १८ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे ब्रेग्झिटबाबत खासदारांचे मत अजमावता यावे, यासाठी १४ ऑक्टोबरला ब्रिटन पार्लमेंटचे अधिवेशन भरवले जाईल, असे सरकारी गोटातून सांगण्यात आले. युरोपीय मंडळाच्या अधिवेशनात ब्रेग्झिटचा नवा मसुदा निश्चित झाला, तर त्या मसुद्यावरील मतदान २१ आणि २२ ऑक्टोबरला संसदेत घेतले जाईल. युरोपीय समुदायाने ‘ब्रेग्झिट’साठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत दिली आहे.

ब्रिटनला इशारा

कोणत्याही समझोत्याशिवाय ब्रिटन युरोपीय समुदायातून बाहेर पडला, तर जे परिणाम होतील त्यांना तोच सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा युरोपीय समुदायाने मंगळवारी जॉन्सन यांना दिला आहे. कोणत्याही समझोत्याशिवाय ब्रिटन युरोपीय समुदायातून बाहेर पडला तर त्याला मोठय़ा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

ट्रम्प यांच्याकडून कौतुक

ब्रिटन पार्लमेंट संस्थगित केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘‘ब्रिटनला योग्य नेता मिळाला आहे,’’ या शब्दांत जॉन्सन यांचे जाहीर कौतुक केले आहे. युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यावर अमेरिका ब्रिटनशी व्यापारी संबंध वाढवील आणि त्यांना आर्थिक संकटात पडू देणार नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.