‘सीआयए’ या अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांचे प्रतिपादन

ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठी कौल दिल्यानंतर युरोप ‘अनिश्चिततेच्या काळात’ प्रवेश करत असून, १९९३ साली २८ सदस्यांच्या या राजकीय-आर्थिक गटाच्या स्थापनेनंतर हे त्याच्यासमोरील ‘सगळ्यात मोठे आव्हान’ ठरू शकते, असा इशारा सीआयए या अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांनी दिला आहे.

स्थापनेनंतर कुठल्याही सदस्य देशाने ही संघटना सोडलेली नाही. ब्रिटनच्या बाहेर पडण्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा ब्रिटन तसेच युरोपीय महासंघ आढावा घेत असून त्यांच्या वाटाघाटीच्या ताकदीचा अंदाज घेत असल्यामुळे युरोप अनिश्चिततेच्या काळात प्रवेश करत आहे, असे सीआयएचे प्रमुख जॉन ब्रेनन यांनी म्हटले आहे.

युरोपीय महासंघाला अलीकडच्या वर्षांमध्ये ज्या संकटांचा सामना करावा लागला, त्यामध्ये ब्रिटनचे संघटनेतून बाहेर पडणे हे सगळ्यात मोठे आव्हान राहील, असे ब्रेनन म्हणाले.

 

बोरिस जॉन्सन यांची माघार

लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले जाणारे लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्यामुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीला नाटय़मय वळण मिळाले आहे. एका जवळच्या सहकाऱ्याने गुरुवारी ‘पक्षांतर’ केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. हुजूर पक्षाच्या (काँझव्‍‌र्हेटिव्ह पार्टी) यापुढील नेत्याला ब्रिटनचे जगातील स्थान निश्चित करावे लागेल, असे ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडावे यासाठी हिरिरीने प्रचार करणारे जॉन्सन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पार्लमेंटमधील परिस्थिती लक्षात घेऊन मी नेता नसेन असे ठरवले आहे, असे ते म्हणाले. जॉन्सन यांचे सहकारी जस्टिस सेक्रेटरी मिशेल गोव्ह यांनी कॅमेरून यांचा उत्तराधिकारी होण्याच्या शर्यतीत असल्याचे जाहीर करून राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा धक्का दिला.