बल्लारी जिल्ह्य़ातील लोहखनिजाचे विपुल साठे असलेली ३६६७ एकर जमीन जेएसडब्ल्यू पोलाद कंपनीला विकण्याच्या व्यवहारात काँग्रेस- जद (एस) सरकारला ‘लाच’ मिळाली असल्याचा आरोप कर्नाटक भाजपने रविवारी केला.

आपली कंपनी कधीही काही बेकायदेशीर किंवा राज्याच्या लोकांच्या अहिताचे असे काहीही करत नाही, असे जेएसडब्ल्यूचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांनी म्हटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी हे वक्तव्य केले आहे.

१.२२ लाख रुपये एकर या दराने ३६६७ एकर जमीन जिंदाल यांना विकण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध आम्ही बंगळुरूत तीन दिवसांचे आंदोलन करणार आहोत, असे येडियुरप्पा यांनी यादगीर येथे पत्रकारंना सांगितले. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही आणि गरज पडली, तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचेही आम्ही ठरवले आहे, असे ते म्हणाले.

आघाडी सरकारला काही लाच मिळाली काय असे विचारले असता येदियुरप्पा म्हणाले, की तसे नसते तर त्यांनी हे का केले असते? लोकसभा निवडणुकानंतर त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिली गोष्ट केली, ती ३६०० एकर जमीन देण्याची. काँग्रेसचे नेते एच.के. पाटील यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे.

लाचेची रक्कम कुणाला मिळाली या प्रश्नावर, ‘आणखी कुणाला? जे लोक सरकार चालवत आहेत त्यांना’, असे उत्तर येडियुरप्पा यांनी दिले.

बल्लारी जिल्ह्य़ात जेएसडब्ल्यू स्टीलला भाडेपट्टीवर देण्यात आलेल्या ३६६७ एकर जमिनीची सुरुवातीच्या करारानुसार त्यांना विक्री करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला होता.

सरकारने अतिशय कमी किमतीत ही जमीन कंपनीला विकल्याचा आरोप करून, या निर्णयाच्या विरोधात भाजप १३ जूनपासून बंगळुरूत तीन दिवसांचा सत्याग्रह करेल असे येडियुरप्पा यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.