डोकलाम आणि लडाखमध्ये भारत- चीनचे सैन्य आमने-सामने आल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात मंगळवारी चर्चा झाली. सुमारे तासभर झालेल्या द्विपक्षीय चर्चेत डोकलामसारखी स्थिती पुन्हा नको, असा सूर दोन्ही नेत्यांनी आळवला.

चीनमधील शियामेन येथे ब्रिक्स परिषद सुरु असून या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. डोकलाम आणि लडाख येथे दोन्ही देशांचे सैन्य आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला असताना ही चर्चा झाली. या चर्चेकडे जगभराचे लक्ष लागले होते. चर्चेनंतर भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषेदत माहिती दिली. दोन्ही देशातील सैन्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यावर एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध निर्माण होण्यासाठी शांतता आवश्यक असून यासाठी सीमवेर शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्याचे जयशंकर यांनी नमूद केले.

डोकलामच्या मुद्द्यावर काही चर्चा झाली का याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारले असता जयशंकर म्हणाले, भविष्याचा विचार करुन दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. भूतकाळात काय झाले यापेक्षा यापुढील वाटचालीवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. मसूद अझहरविषयी चर्चा झाली का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, या विषयावर चर्चा झाली नाही.मात्र ब्रिक्स परिषदेतील घोषणापत्रात दहशतवादाविरोधात दोन्ही देश एकत्र असल्याचे स्पष्ट होते. द्विपक्षीय चर्चेपूर्वी शी जिनपिंग यांनी मोदींचे स्वागत केले. तर मोदींनीही शाही स्वागतासाठी जिनपिंग यांचे आभार मानले.