सहाव्या ब्रिक्‍स परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्राझीलला रवाना झाले आहेत. ब्रिक्‍स परिषद १५ व १६ जुलै रोजी होणा-या या परिषदेत विकास बॅंकेची स्थापना, संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांतील सुधारणांची मागणी यावर निर्णय होईल.
ब्राझीलला जाण्यासाठी रवाना झाल्यावर मोदी म्हणाले की, ब्राझीलचे अध्यक्ष डिल्मा रुसेफ यांच्या आमंत्रणावर मी फोर्तलेझा आणि ब्रसोवा येथे १५ व १६ जुलै आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या ब्रिक्स परिषदेसाठी रवाना होत आहे.  जागतिक आर्थिक वाढ, शांती आणि स्थिरता प्रोत्साहित करण्यासाठी भारतासाठी ब्रिक्स हे महत्वाचे आहे. मोदींची पाश्चिमात्य देशांतील बहुपक्षीय व्यासपीठावर ही पहिली उपस्थिती असणार आहे. पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर मोदी यांनी भुतानचा दौरा केला होता. मात्र, सार्क देशांबाहेर मोदींचा हा पहिला विदेश दौरा आहे. पंतप्रधान मोदी आज सुरवातीला जर्मनीला जाणार असून, तिथून रात्री ते ब्राझीलमधील फोर्तलेझा या शहराकडे रवाना होतील. ब्राझील, चीन, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांची ब्रिक्‍स परिषद तिथे होणार असून, अनेक विषयांवर या परिषदेत चर्चा होईल. मोदी यांच्यासमवेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री निर्मला सीतारामन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ए. के. डोवाल, परराष्ट्र सचिव सुजाता सिंह आणि अर्थ सचिव अरविंद मायारामदेखील आहेत.