पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग 21 विमान कोसळले. या विमानातील वैमानिक बेपत्ता असल्याचं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. तर पाकिस्ताननं हा वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचं म्हटलं आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान असं या वैमानिकाचं नाव आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी अभिनंदनचा एक व्हिडिओही जारी केला मात्र या व्हिडिओची सत्यता स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान विंग कमांडर अभिनंदनच्या कुटुंबीयांनी एक भावनिक आवाहन सरकारला केलं आहे. अभिनंदनला सुखरूप परत आणा असं त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. अभिनंदन वर्थमान हा मूळचा चेन्नईचा राहणारा आहे. त्याचे वडिलही वायुदलातच होते. एअर मार्शल (निवृत्त) सिमहाकुट्टी वर्थमान असं त्यांचं नाव आहे. अभिनंदनबद्दल ज्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आम्ही बघतो आहोत त्या पाहून अतीव दुःख होते आहे. मी अभिनंदनची दृश्यं टीव्हीवर बघतो आहे. मी आता त्याच्या आई वडिलांना भेटायला जातो आहे. त्याला कृपा करून सुखरूप परत आणा असं आवाहन अभिनंदनच्या काकांनी केलं आहे.
बुधवारी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. भारताच्या सतर्क हवाई दलाने प्रत्युत्तर देण्याची सुरु करताच पाकचे विमान माघारी फिरले. हवाई दलाने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून ते पाकच्या हद्दीत जाऊन कोसळले आहे. यादरम्यान भारताचे मिग २१ हे लढाऊ विमान देखील कोसळले आहे. या विमानातील वैमानिक बेपत्ता असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. या विमानात अभिनंदन वर्थमान हे वैमानिक होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2019 5:02 am