पूर्वीच्या एनडीएप्रणित भाजप सरकारने तीन अतिरेक्यांची सुटका करून त्यांना विमानाने कंदहारला नेऊन सोडले होते तसेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा पाकिस्तानात सार्क शिखर बैठकीला जातील तेव्हा त्यांनी तेथून अतिरेक्यांना विमानातून सोबत घेऊन यावे, असा टोमणा उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी मारला आहे.
इफ्तार पार्टीच्या वेळी त्यांनी सांगितले की, मागील काळातील विमान अपहरण प्रकरणात जसे अतिरेक्यांची सुटका करून विमानाने सोडण्यात आले होते तसे मोदी यांनी आता अतिरेक्यांना आपल्या देशात त्यांच्या विमानातूनच घेऊन यावे. आयसी ८१४ विमानाचे अपहरण करून ते कंदहारला नेण्यात आले होते, त्यावेळी १५५ प्रवाशांची सुटका करण्यासाठी मौलाना मसूद अझर याच्यासह तीन कट्टर अतिरेक्यांची सुटका भाजप सरकारने केली होती.
भारताने २६/११ च्या हल्ल्यातील सूत्रधार झाकीउर रहमान लख्वी व जमात उद दवाचा प्रमुख हाफिज सईद यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. दाऊद इब्राहिम व त्याच्या साथीदारांनाही ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली असून पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे नवाज शरीफ यांच्याशी रशियात केलेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी सार्क शिखर बैठकीसाठी पाकिस्तान भेटीचे दिलेले निमंत्रण स्वीकारले आहे.
माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी यांच्याबाबतच्या वादावर विचारले असता खान यांनी सांगितले की, त्यांच्यावरील आरोपांची चौकशी झाली पाहिजे.