पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या वेगवेगळया भागातून जमावाच्या हिंसक प्रतिक्रिया समोर येत आहेत. पुलवामाची घटना आणि देशाविरोधात बोलणाऱ्यांना जमावाकडून लक्ष्य करण्यात येत आहे. फेसबुकवर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील एका युवकाच्या घरावर जमाव धडकल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते आहे. सरबजित सहा नावाच्या माणसाने हा व्हिडिओ पोस्ट केला असून देशद्रोहीच्या घराजवळ आपण आहोत असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असलेल्या अनिक दास या विद्यार्थ्यांच्या घरात घुसण्याचा या जमावाकडून प्रयत्न सुरु होता. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

अनिक दासने ‘माझे देशावर प्रेम नाही’ हा त्याच्या आवाजातील व्हॉईस रेकॉर्डिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दारावर उभा असलेला जमाव पाहून अनिक दासच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला. ते जमावाल शांत राहण्याची विनवणी करत होते. अनिकला बाहेर बोलवा अशी मागणी हा जमाव करताना दिसत आहे.

या संपूर्ण घटनेचे जमावाने फेसबूक लाईव्ह केले. तुमच्या देशद्रोही मुलाला बाहेर काढा. त्याने लष्कराविरुद्ध पोस्ट केले आहे असे जमाव या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. हा मुलगा जमावासमोर आल्यानंतर मी देश विरोधी नाही असे तो सांगत होता. पण जमावाच्या बोलण्यासमोर त्याचा आवाज क्षीण झाला. तू आपल्या देशावर का प्रेम करत नाहीस ? असा प्रश्न त्याला विचारला. त्याला रस्त्यात गुडघ्यावर बसवून ‘पाकिस्तान मुर्दाबाद, भारतीय लष्कर झिंदाबाद’च्या घोषणा द्यायला लावल्या.