14 December 2019

News Flash

‘प्लास्टिकचा कचरा द्या, मोफत जेवण घ्या’, खास कारणासाठी महापालिकेची आगळीवेगळी योजना

एक किलो 'प्लास्टिकचा कचरा दिल्यास पूर्ण जेवण आणि अर्धा किलो दिल्यास नाश्ता मिळणार

प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी हा सध्याच्या काळातील सर्वात मोठा प्रश्न आहे. भारतासारख्या देशामध्ये रोज लाखो टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण होते. अनेकदा कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधून प्लास्टिक गोळा करुन पोटाची खळगी भरणारे लोक आपल्याला दिसतात. मात्र दिवसभर कष्ट करुनही त्यांना अनेकदा जेवणापुरते पैसेही मिळत नाही. मात्र प्लास्टिकचा कचरा गोळा करुन पर्यावरण संवर्धानला हातभार लावणाऱ्या याच कचरावेचक मुलांना पुरेसे अन्न मिळावे म्हणून चंढीगडमध्ये देशातील पहिले ‘गार्बेज रेस्टॉरंट’ सुरु करण्यात आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये कचरा गोळा करणाऱ्या मुलांना प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यात महापालिकेमार्फत मोफत जेवण दिले जाणार आहे.

चंढीगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूर शहर हे देशातील दुसरे सर्वात स्वच्छ शहर असून याच शहरामध्ये हे ‘गार्बेज रेस्टॉरंट’ सुरु करण्यात आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये प्लास्टिकचा एक किलो कचरा देणाऱ्याला संपूर्ण जेवण तर ५०० ग्राम कचरा देणाऱ्यांना नाश्ता देण्यात येणार आहे.

अंबिकापूर महानगरपालिका हे प्लास्टिक रस्ते बांधण्यासाठी वापरणार आहे. ‘या रेस्टॉरंटसाठी कचरा गोळा करण्याचे काम शहरातील प्रमुख बसस्टॉपजवळ केले जाईल’ अशी माहिती शहराचे महापौर अजय तिरकी यांनी सोमवारी शहराचा अर्थसंकल्प मांडताना दिली. या ‘गार्बेज रेस्टॉरंट’साठी पालिकेने अर्थसंकल्पामध्ये पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे. याच कचरा गोळा करणाऱ्यांना मोफत राहण्याची सोय उपलब्ध करुन देण्याचा पालिकेचा विचार आहे.

अंबिकापूर शहरामध्ये या आधीच प्लास्टिक वापरून रस्ते बांधण्यात आले आहेत. आठ लाख प्लास्टिकच्या पिशव्या आणि सल्फेट वापरून तयार करण्यात आलेला रस्ता हा डांबरी रस्त्याइतकाच टिकाऊ असून सल्फेटमुळे या रस्त्यामध्ये पाणी मुरत असले तरी त्याचा रस्त्यावर परिणाम होत नाही. सध्या अंबिकापूरमध्ये प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ही ‘गार्बेज रेस्टॉरंट’ योजना शहरामध्ये योग्य पद्धतीने राबवण्यात येईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.

First Published on July 19, 2019 6:19 pm

Web Title: bring plastic waste and eat full meal at indias first garbage cafe in chhattisgarh scsg 91
Just Now!
X