इंडोनेशिया व इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्यानंतर फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी या देशांनीही बोईंग ७३७ मॅक्स विमाने व्यावसायिक सेवेतून काढून घेतली आहेत. याशिवाय सिंगापूर, ओमान, मलेशिया, नॉर्वे या देशांनीही मंगळवारी बोईंग ७३७ मॅक्स सेवेतून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर अमेरिकेने अद्याप विमान सेवेतून काढून घेण्याचा निर्णय घेतला नसला तरी अमेरिकेतील प्रवाशांनी विमानाबाबत शंका उपस्थित केल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी हवाई वाहतूक कंपन्यांना दिली आहे.

इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमानाला रविवारी भीषण अपघात झाला. इंडोनेशियातील अपघातानंतर बोईंग विमानाला हा दुसरा भीषण अपघात होता. रविवारी झालेल्या अपघातात १५७ जण ठार झाले आहेत. इथिओपियन एअरलाइन्सचे विमान नैरोबीकडे जाण्यासाठी उडाले असताना सहा मिनिटात ते कोसळले होते त्यात सर्व प्रवासी ठार झाले. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर चीननेही सर्वप्रथम बोईंग ७३७ मॅक्स ८ विमाने व्यावसायिक सेवेतून काढून घेतली. त्यानंतर जगभरात विविध देशांनी बोईंग ७३७ मॅक्स या विमानांचा वापर बंद केला आहे. युरोपमधील फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी या प्रमुख देशांसह सिंगापूर, ओमान, मलेशियान, नॉर्वे, आयर्लंड या देशांनी बोईंग ७३७ मॅक्स या विमानांचा वापर बंद केला आहे. इतकंच नव्हे सिंगापूरने बोईंग ७३७ मॅक्स या विमानांना त्यांच्या देशातील हवाई हद्दीचा वापर करण्यावरही निर्बंध घातल्याने त्याचा फटका हवाई वाहतुकीला बसण्याची चिन्हे आहेत.

दुसरीकडे अमेरिकेने बोईंग ७३७ मॅक्स या विमानासंदर्भात सावध भूमिका घेतली आहे. अमेरिकेतील दोन हवाई वाहतूक कंपन्या या विमानांचा वापर करतात. इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमान अपघाताचा तपास अद्याप प्राथमिक स्तरावर आहे. यासंदर्भात सखोल तपास केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे अमेरिकी हवाई प्रशासनाने स्पष्ट केले आहे.