भारतात करोना रुग्णांचा विस्फोट पाहता इतर देशांनी धसका घेतला आहे. करोना स्थिती हाताबाहेर गेल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. या आठवड्यात ते भारत दौऱ्यावर येणार होते. मात्र करोनाचा प्रकोप पाहता त्यांनी नियोजित दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

बोरिस जॉनसन यांनी दूसऱ्यांदा भारत दौऱ्यावर येण्याचं टाळलं आहे. यापूर्वी २६ जानेवारीला मुख्य अतिथी म्हणून ते भारतात येणार होते. मात्र तेव्हाही त्यांनी भारतात येण्याचं टाळलं होतं. सध्याच्या करोना स्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं ब्रिटन परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दूसरीकडे, बोरिस जॉनसन यांच्या नियोजित भारत दौऱ्यावर ब्रिटनमध्ये जोरदार विरोध होत होता. विरोध पक्षांनी जॉनसन यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे हा निर्णय घेतला असंही बोललं जात आहे.

इस्रायलने ‘करुन दाखवलं’!… मास्क घालण्यावरील निर्बंध उठवले

ब्रिटनमधील लेबर पार्टीनं जॉनसन यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. ‘ब्रिटन सरकार नागरिकांना सांगत आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा. मात्र बोरिस जॉनसन तसं करताना दिसत नाही. भारतासोबत ते झूम मीटिंगवर चर्चा करु शकतात. या वेळेत सर्वजण हेच करत आहेत. पंतप्रधानांनी आपला दौरा रद्द करुन नागरिकांना संदेश द्यायला हवा’, असं लेबर पार्टीचे स्टीव रीड यांनी सांगितलं होतं.

दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर

ब्रेक्झिटनंतर जॉनसन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली नाही. तसंच पोस्ट ब्रेक्झिटवर कोणताही करार झाला नसल्याने ही भेट महत्त्वाची आहे. त्यामुळे या वर्षात बोरिस जॉनसन आणि नरेंद्र मोदी यांची भेट होईल असं ब्रिटीश पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. तर ब्रिटनने जी-७मध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. यात भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांना अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आलं आहे.