ब्रिटनच्या रशियातील हेरावर मार्चच्या पहिल्या आठवडय़ात विषप्रयोग झाल्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. रशियाकडून ब्रिटनच्य सार्वभौमत्वावर हल्ला झाल्याचा आरोप ब्रिटटने केला आहे. तर रशियाने या प्रकरणात त्यांचा हात असल्याचे आरोप नाकारले आहेत. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक तरंग निर्माण झाले आहेत. त्यांचा हा मागोवा

पाश्र्वभूमी

सर्गेई स्क्रिपाल हा १९९० च्या दशकात रशियाच्या गुप्तहेर खात्यात कर्नल दर्जाचा अधिकारी होता. १९९५ पासून तो ब्रिटनच्या हेरगिरी संस्थांना फितुर झाला आणि ब्रिटनसाठी हेरगिरी करत राहिला. रशियाच्या सुरक्षा दलांनी डिसेंबर २००४ मध्ये त्याला मॉस्कोमध्ये अटक केली आणि १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. २०१० पर्यंत तो तुरुंगात होता. त्यानंतर त्याला ब्रिटन आणि रशियात झालेल्या गुप्तहेरांच्या अदलाबदलीत सोडून देण्यात आले. त्यानंतर तो ब्रिटनचा नागरिक बनून राहत होता. त्याची मुलगी युलिया रशियात नोकरी करत होती. ती मार्चच्या पहिल्या आठवडय़ात वडिलांना भेटण्यासाठी ब्रिटनमध्ये आली होती. ४ मार्च २०१८ रोजी सर्गेई स्क्रिपाल (वय ६६) आणि त्याची मुलगी युलिया (वय ३३) हे दोघे इंग्लंडमधील सॅलिसबरी येथे एका बागेत बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे आढळून आले. सध्या त्यांच्यावर ब्रिटनमध्ये रुग्णालयात उपचार होत असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

संशयाची सुई रशिया आणि व्लादीमीर पुतिन यांच्याकडे स्क्रिपाल आणि त्यांच्या मुलीवर रशियाच्या गुप्तहेर संस्थांनी विषप्रयोग केला असा संशय व्यक्त होत आहे. रशियाशी विश्वासघात करून ब्रिटनला गुप्त माहिती पुरवल्याचा बदला रशियाने घेतल्याचे माने जात आहे. तसेच त्यात रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांचा हात असल्याचाही संशय आहे. स्क्रिपाल यांच्यावर नोव्हिचोक नावाच्या विषारी द्रव्याचा प्रयोग केल्याचे ब्रिटनने केलेल्या तपासात दिसून आले आहे. नोव्हिचोक हे विषारी द्रव्य मानवाच्या चेतासंस्थेवर परिणाम करते. त्यामुळे त्याला अत्यंत विषारी नव्‍‌र्ह  एजंट मानले जाते. रशियाने १९७० आणि १९८० च्या दशकांत त्याचा ‘फॉलिएंट’ या सांकेतिक नावाच्या प्रकल्पांतर्गत रासायनिक अस्त्र म्हणून विकास केला होता. नोव्हिचोक या रशियन शब्दाचा इंग्रजी अर्थ ‘न्यू कमर’ म्हणजे नव्याने आगमन झालेला असा आहे. व्हीएक्स, टॅब्यून, सरीन, सोमन आदी विषारी द्रव्यांपेक्षा तो पाच ते दहापट अधिक विषारी आहे. जगातील खूप कमी संस्थांकडे नोव्हिचोक उपलब्ध आहे. स्क्रिपाल यांच्यावर नोव्हिचोक-५ किंवा ए-२३२ प्रकारच्या नोव्हिचोकचा वापर झाला असे मानले जात आहे. यापूर्वीही रशियाने ब्रिटनमध्ये पळून गेलेल्या माजी गुप्तहेरांवर असा प्रकारे विषप्रयोग केले होते.

आरोप-प्रत्यारोप

ब्रिटनच्या भूमीवर, त्यांच्या नागरिकावर केलेला विषप्रयोग म्हणजे रशियाने ब्रिटनच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आहे आणि तो खपवून घेतला जाणार नाही, असे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व तपास सुरू केला आहे. रशियाने या प्रकरणात त्यांचा हात असल्याच्या आरोपांचा इन्कार केला आहे. तसेच तपासात सहकार्याची तयारी दाखवली आहे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदी देशांनी ब्रिटनला पाठिंबा दर्शवत रशियाचा धिक्कार केला आहे. ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्सने या घटनेचा निषेध करून अद्याप रासायनिक अस्त्रांचा वापर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच गुन्हेगारांना शासन करण्याचा निर्धार व्यक्त केला.  युरोपीय महासंघ आणि नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो) यांनीही या घटनेचा निषेध केला.

ब्रिटनकडून रशियावर कारवाई

* ब्रिटनने रशियावर संशय व्यक्त करत या प्रकरणाचा तपास सुरू केला.

* ब्रिटनमधील रशियाच्या २३ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली.

* जून २०१८ मध्ये रशियात होत असलेल्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल सामन्यांवर ब्रिटनच्या मंत्री आणि शाही कुटुंबाने बहिष्कार घातला.

* ब्रिटनमध्ये – विशेषत: रशियामधून – येणाऱ्या प्रवाशांवर विशेष बंधने घातली आणि अधिक तपास सुरू केला.

* रशियातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीवर बंधने घालण्याची शक्यता.

राजकीय पेच आणि रशियाविरुद्ध कारवाईवरील मर्यादा

* आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि हेरगिरीच्या जगतात अशा घटना घडत असतात आणि त्याने दोन देशांचे संबंध पूर्णपणे तोडले जात नाहीत. तसेच त्यावरून परिस्थिती चिघळू देऊन आंरराष्ट्रीय शांततेला दोका उत्पन्न होऊ देता येत नाही.

* ब्रिटन सध्या ब्रेग्झिटोत्तर पेचप्रसंगातून जात आहे. त्या देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. रशियातील नवश्रीमंत वर्ग तेथील अस्थिरता आणि धोकादायक जीवनाला कंटाळून मोठय़ा प्रमाणात ब्रिटन, आणि त्यातही लंडनच्या रिअल इस्टेट बाजारात गुंतवणूक करत आहे. रशियावर कारवाई करून ब्रिटन या फायद्यापासून वंचित राहू ईच्छित नाही.

* व्लादीमीर पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशियाने अमेरिका आणि युरोपचा विरोध डावलून क्रिमिया, युक्रेन आणि सीरियात हस्तक्षेप केला आहे. तेव्हा या प्रकरणातही पुतिन यांचा रशिया पाश्चिमात्य दबावापुढे किती झुकेल याबाबत साशंकता आहे.

* उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र महत्त्वाकांक्षेला आळा घालण्यासाठी पाश्चिमात्य देशांना रशियाच्या मदतीची गरज आहे. तसेच इराणबरोबरील अणुकरार यशस्वी होण्यासाठीही रशियाच्या साथसोबतीची आवश्यकता आहे.

* डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणात ब्रिटनला साथ दिली असली तरी रशियाविरुद्ध उघडपणे विरोधी भूमिका घेणे त्यांना जड जात आहे. कारण रशियाच्या गुप्तहेर संस्थानी ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होण्यासाठी मदत केल्याचे मानले जाते.

संकलन : सचिन दिवाण