ब्रिटिश अभिनेते बॉब हॉस्किन्स (७१) यांचे मंगळवारी रात्री येथील रुग्णालयात निधन झाले. बॉब हे न्युमोनियाने आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबीयांतर्फे याबाबतचे निवेदन प्रसारित करण्यात आले.
पार्किन्सन या दुर्धर आजार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बॉब यांनी २०१२ मध्ये ६९ व्या वर्षी चित्रपटात काम करण्याचे बंद केले. नुकतेच न्युमोनियाने आजारी पडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मंगळवारी सायंकाळी कुटुंबाच्या उपस्थितीतच त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
१९६९ मध्ये चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या बॉब यांनी चार दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत ८० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. स्टीव्हन्स स्पिलबर्ग यांच्या हूक चित्रपटामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. ‘मोना लिसा’ चित्रपटासाठी त्यांचे ऑस्करसाठी नामांकन झाले होते. तसेच उत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा गोल्डन ग्लोब पुरस्कारही त्यांनी पटकावला होता. बॉब यांच्या निधनामुळे जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी दुख व्यक्त केले.