गेल्या काही दिवसांपासून विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या कारभाराचा फटका अनेकांना बसत असल्याचे दिसत आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांना देखील याचा अनुभव आला. ब्रिटिश एअरवेजच्या BA198 विमानाने मुंबई ते लंडन प्रवास करताना विमानात धूर निघाल्याने हे विमान अजरबैजानच्या बाकू विमानतळावर उतरवण्यात आले. सुमारे १९ तास प्रवाशांना या विमानतळावर ताटकळत राहावे लागले. विमान कंपनीने या प्रवाशांना कोणतीच सुविधा दिली नाही. भट्टाचार्य आणि इतर प्रवाशांना संपूर्ण रात्र विमानतळाच्या फरशीवर झोपून घालवावी लागली. १९ तासांच्या प्रतिक्षेनंतर सर्वांना दुसऱ्या विमानाने लंडनला पाठवण्यात आले. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

अरूंधती भट्टाचार्य या ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने मुंबईहून लंडनला जात होत्या. बर्फवृष्टीमुळे या विमानाला उशीर झाला होता. त्यातच विमानात धूर आल्याने हे विमान त्वरीत बाकू विमानतळावर उतरवण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवासी १९ तास तिथे अडकले होते. या प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा पुरवणे विमान कंपनीचे कर्तव्य होते. परंतु, कंपनीने प्रवाशांच्या राहण्याची आणि खाण्याची कोणतीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे भट्टाचार्य यांच्यासह या विमानातील सर्वच प्रवाशांना विमानतळावरील फरशीवर झोपून रात्र काढावी लागली. तब्बल १९ तासानंतर या प्रवाशांना विमानाने लंडनला पाठवण्यात आले.

भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाकू येथे रात्री ९ च्या सुमारास विमान लँड झाले. मी रात्री एअरपोर्टच्या लाऊंजमध्ये कार्पेटवर झोपले. विमानाची दुरूस्ती करण्यात आली होती. पण क्रू ची शिफ्ट संपल्यामुळे ते विमान उडू शकले नाही.