काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. संसदेच्या आचरसंहिता समितीने सोमवारी राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. ब्रिटनमध्ये असताना तुम्ही स्वत:ला ब्रिटीश नागरिक घोषित केले होते का, असा प्रश्न या नोटिसीद्वारे राहुल गांधी यांना विचारण्यात आल्याची माहिती, या समितीचे सदस्य अर्जून मेघवाल यांनी दिली. मात्र, काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी यांना अशाप्रकारची कोणतीही नोटीस मिळाल्याचे नाकारण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात भाजप खासदार महेश गिरी यांनी कोणतीही व्यक्ती संविधानापेक्षा मोठी नसल्याचे सांगत लोकसभा अध्यक्षांकडे याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. गिरी यांनी आपल्या तक्रारीत राहुल यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करत यासंदर्भात अनेक विरोधी गोष्टी समोर आल्याचे म्हटले होते. राहुल यांचे नागरिकत्व हे मोठे रहस्य बनले आहे. जर त्यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व असेल तर ही चितेंची बाब आहे, असेही गिरी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले होते.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींकडे भारतासोबतच ब्रिटनचे नागरिकत्व असल्याचा आरोप केला होता. यासाठी स्वामी यांनी काही कागदपत्रही सादर केली होती. ब्रिटीश कंपनीतील कागदपत्रांमध्ये राहुल गांधी यांनी ब्रिटीश नागरिक असल्याचा उल्लेख केल्याचे स्वामी यांनी म्हटले होते. मात्र, राहुल गांधी यांना ब्रिटीश नागरिक दाखवले जाणे ही टायपिंगमधील चूक असू शकते असे स्पष्टीकरण युरोपी महासंघाच्या कंपनी हाऊस विभागातर्फे देण्यात आले होते.