इराकमधील ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस)या दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्यासाठी इराकवर आंतरराष्ट्रीय समूहाने हवाई हल्ले करण्याचा विचार सुरू केला असून, यात सहभागी होण्याचा विचार ब्रिटनही करत आहे. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून लवकर याबाबत ब्रिटिश संसदेचे मत अजमावणार आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या अधिसभेत बोलताना कॅमेरून यांनी इराकवर आंतरराष्ट्रीय हवाई हल्ले करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली हे हवाई हल्ले होणार असून, त्यात सहभागी होण्याचा विचार करत असल्याचे कॅमेरून यांनी सांगितले.
इसिस या संघटनेकडून जगाला धोका निर्माण झाला असून, त्यांच्या अनेक युरोपीय नागरिकांची हत्या करण्यात आलेली आहे. सीरियाचे अध्यक्ष बशार असाद यांनीही या दहशतवादी संघटनेपुढे हात टेकले असून, ही संघटना दिवसेंदिवस धोकादायक होत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यावर हवाई हल्ले करणे जरुरीचे झाले आहे, असे कॅमेरून म्हणाले.
इराकवर हवाई हल्ले करण्यासंदर्भात असाद यांचा कोणताही हस्तक्षेप नाही, मात्र इराकी पंतप्रधानांनी या निर्णयाला विरोध केला आहे. ‘‘या दहशतवादी संघटनेचा जगाला धोका असला तरी अमेरिका आणि अन्य देशांनी हवाई हल्ले करताना इराकमधील सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा करण्याची ग्वाही दिल्यास या हल्ल्यांना आमचा विरोध नसेल,’’ असे इराकच्या पंतप्रधानांनी सांगितले.
९ दहशतवाद्यांना अटक
इसिस या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याच्या संशयावरून स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी गुरुवारी नऊ जणांना अटक केली. ब्रिटनमधील वेस्ट मिडलँड राज्यातील काही भागांमध्ये पोलिसांनी छापे टाकून या दहशतवाद्यांना गजाआड केले. हे दहशतवादी २२ ते ४७ या वयोगटातील असून, लंडनस्थित इस्लामी धर्मगुरू अंजेम चौधरी याचाही अटक करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
फ्रान्सही हल्ले करणार
पॅरिस : हार्वे गौरडेल या फ्रेंच नागरिकाचा शिरच्छेद केल्याने फ्रान्सही इराकवर हवाई हल्ले करण्याच्या तयारीत आहे. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कॉइज हॉलंड यांनी यासंदर्भात गुरुवारी बैठका घेऊन ही घोषणा केली. गौरलेड या गिर्यारोहकाची दहशतवाद्यांनी इराकमध्ये हत्या केली आहे. पॅरिस : हार्वे गौरडेल या फ्रेंच नागरिकाचा शिरच्छेद केल्याने फ्रान्सही इराकवर हवाई हल्ले करण्याच्या तयारीत आहे. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कॉइज हॉलंड यांनी यासंदर्भात गुरुवारी बैठका घेऊन ही घोषणा केली. गौरलेड या गिर्यारोहकाची दहशतवाद्यांनी इराकमध्ये हत्या केली आहे.