दिल्लीतील अंध विद्यार्थ्यांच्या शाळेतील तीन अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून एका ब्रिटीश नागरिकाला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील आर. के. पुरम या भागात ही अंध शाळा आहे. मरे डेनिस वॉर्ड असे अटक करण्यात आलेल्या ब्रिटीश नागरिकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरे डेनिस वॉर्ड हा मागील ९ वर्षांपासून दिल्लीत अंधशाळेला देणगी देत होता. याच अंधशाळेतील तीन मुलांचे लैंगिक शोषण केले जात होते आणि अत्याचार करणारा नराधम मरे डेनिस वॉर्डच आहे, अशी माहिती आम्हाला कंट्रोल रूमला आलेल्या फोन कॉलवरून मिळाली. त्यानंतर रविवारी दुपारी आम्ही या अंधशाळेत गेलो आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला अशी माहिती पोलिसांनी दिली.

तीन अल्पवयीन अंध मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली आहे. ५४ वर्षांचा मरे डेनिस वॉर्ड हा मूळचा ग्लोस्टरशेअरचा रहिवासी आहे. एप्रिल २०१७ पर्यंत मरे हा  गुडगावच्या ‘स्टरलाइट टेक्नॉलॉजी’ मध्ये काम करत होता.

मरे डेनिस वॉर्डला फेब्रुवारी २०१७ मध्ये पक्षाघाताचा झटका आला होता, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आम्ही त्याचा मोबाईल फोन आणि मॅकबुक ताब्यात घेऊन तपासले आहे. आम्हाला त्यामध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्स सापडल्या आहेत असेही पोलिसांनी सांगितले.