ब्रिटिश वृत्तपत्रांत संमिश्र प्रतिक्रिया

लंडन : ब्रिटनमधील वृत्तपत्रांनी ब्रेग्झिटच्या संदर्भात ‘नवीन पहाट की मोठा जुगार’ अशी खोचक टिप्पणी केली असून बहुतांश वृत्तपत्रांनी त्यांच्या पहिल्या पानांवर युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याच्या कृतीने काही लोकांना झालेला आनंद तर ब्रेग्झिट विरोधकांची काहीशी दु:खाची भावना यांचा समतोल साधला आहे.

जवळपास अर्ध शतकानंतर ब्रिटन युरोपीय समुदायातून बाहेर पडला. डेली एक्स्प्रेसने ‘येस वुई डीड इट’ असा मथळा दिला आहे. या टॅब्लॉइडचा ब्रेग्झिटला पाठिंबाच होता. ब्रिटनच्या नकाशावर हा मथळा टाकण्यात आला असून हा नकाशाही जून २०१६ च्या काडीमोडाच्या निर्णयानंतरच्या काळातील वृत्तपत्रांच्या पानांनी भरला होता.

दी डेली मेलनेही ब्रिटनसाठी ही नवी पहाट असल्याचे म्हटले आहे. ४७ वर्षांनी ब्रिटन मुक्त व स्वतंत्र होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डावीकडे झुकलेल्या गार्डियनने ‘स्मॉल आयलंड’ असा मथळा दिला आहे. ब्रेग्झिट हा मोठा जुगार असल्याचे मत या वृत्तपत्राने व्यक्त केले आहे.

दी टाइम्सने म्हटले आहे की, पंतप्रधान जॉन्सन यांना ब्रसेल्सशी कॅनडा पद्धतीचे व्यापार करार हवे आहेत. दी फायनान्शियल टाइम्सने ब्रिटनचे युरोपीय समुदायातून बाहेर पडणे हे आशावाद व खेद अशा संमिश्र भावना निर्माण करणारे असल्याचे म्हटले आहे. डेली टेलिग्राफने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे ‘हा शेवट नव्हे सुरुवात’ हे विधान अधोरेखित केले आहे. टॅब्लॉइड डेली मिररने पहिल्या पानावरची जागा करोना विषाणूच्या संसर्गाने वेगळे ठेवलेल्या दीडशे संशयित लोकांच्या बातमीने सजवली आहे. अगदी थोडी जागा ‘ब्रेग्झिट डे’ला दिली आहे. आता देशाला पुन्हा एकत्र आणण्याचे आव्हान आहे असे त्यांनी म्हटले आहे.

स्कॉटलंडमध्ये थंड स्वागत!

ब्रेग्झिटला विरोध असलेल्या स्कॉटलंडमध्ये या सगळ्या घटनेचे थंड स्वागत झाले आहे. दी स्कॉटसमनने म्हटले आहे की, ‘फेअरवेल नॉट गुडबाय’. डेली रेकॉर्डने म्हटले आहे की, ‘शॉर्ट चेंजड- आयसोलेटेड, वर्स ऑफ, विकर अँड डिव्हायडेड’. दी डेली स्टारने या घटनेवर विनोद साधताना ‘दॅटस राईट, इट्स दी एंड ऑफ ड्राय जानेवारी,’ असा मथळा दिला आहे. वर्षांरंभी दारू सोडण्याच्या संकल्पाचा संदर्भ त्याला आहे.