लंडनच्या भूमिगत मेट्रोमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी एका १८ वर्षीय युवकाला अटक केली आहे. शुक्रवारी मेट्रोत झालेल्या हल्ल्याशी त्याचा संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ही कारवाई केली. शुक्रवारी सकाळी ८.२० च्या सुमारास पार्सन्स ग्रीन स्थानकात मेट्रो येत असताना हा स्फोट झाला होता. यात २२ जण जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी आयसीस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी तपास केला जात असून दहशतवादी हल्ल्याचा धोका अजून टळलेला नाही, असे नील बासू नावाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘रॉयटर्स’ला सांगितले.

पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेट्रोत बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसतो. ही संशयित व्यक्ती प्लास्टिकची पांढरी पिशवी घेऊन मेट्रोत चढली. मेट्रोतही सीसीटीव्ही लावण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी येथील मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. देशातील दहशतवादी हल्ल्याचा धोका कमी झालेला नाही. अशा पद्धतीचे आणखी हल्ले होऊ शकतात. ब्रिटनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आल्याचे पंतप्रधान थेरेसा मे शुक्रवारी संध्याकाळी देशवासियांना संबोधून सांगितले.

अटक केलेल्या युवकाबाबत सध्या विस्तृत माहिती देऊ शकत नसल्याचे बासू यांनी म्हटले. सुरक्षेसाठी विविध ठिकाणी पोलीस, सैनिकांना तैनात केल्याची त्यांनी सांगितले. आयईडी स्फोटकांसाठी रिमोटचा वापर करून स्फोट घडवून आणला असून बॉम्ब ठेवणारा स्फोटापूर्वीच तेथून निघून गेल्याचे तपासअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. स्फोटानंतर काही वेळातच पोलिसांनी हा दहशतवादी हलल्याचे जाहीर केले होते. अटक करण्यात आलेल्या संशयिताबद्दल पोलिसांनी अधिक माहिती सांगणे टाळले. गेल्या सहा महिन्यांत ब्रिटनमध्ये झालेला हा पाचवा दहशतवादी हल्ला होता.