ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवाळी साजरी करीत किमान ८ लाख हिंदूंना शुभेच्छा दिल्या. त्यांचे ब्रिटनसाठीचे योगदान मोलाचे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. कॅमेरून यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवाळी पार्टी ठेवली होती. दिव्यांचा हा सण अतिशय महत्त्वाचा आहे, देशासाठी भारतीयांनी केलेल्या योगदानाची आठवण या वेळी होते, माझी मुले येथे नाहीत हे बरे, नाहीतर त्यांनी लगेच मिठाई फस्त केली असती असे त्यांनी म्हटले आहे.
विरोधी मजूर पक्षाचे नेते एड मिलीबँड यांनी पुढील वर्षी आपण पंतप्रधानांच्या १० डाऊनिंग स्ट्रीट कार्यालयात पंतप्रधान म्हणून दिवाळी साजरी करू असे सांगितले. कॉनराड हॉटेल येथे त्यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये भारतीयांचे मोठे योगदान आहे. ब्रिटन हा विविधता असलेला बलवान देश आहे. मे २०१५ मध्ये निवडणुका होत असून त्यात आपण पंतप्रधान होऊ व पुढची दिवाळी पंतप्रधान म्हणून साजरी करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. निवडणुका जवळ आल्याने ब्रिटनमध्ये दिवाळी जोरदार साजरी झाली, कारण ११ टक्के मतदार हे आशियातील असून ते मोठी भूमिका पार पाडू शकतात. २०१० च्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी ७० टक्के जास्त जागांचा निकाल कृष्णवर्णीय व आशियायी मतदारांवर अवलंबून आहे.