संगीत हे मानवी समाजाचा अविभाज्य घटक आहे. विविध कला प्रकारांत सर्वाधिक आनंद देणारा कला प्रकार म्हणजे संगीत. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात चिंता, थकवा, दु:ख कमी करण्याचे प्रभावी काम संगीत करते. आता तर शारीरिक वेदना कमी करण्याचे सामथ्र्य संगीतामध्ये आहे, असे संशोधन ब्रिटिश संशोधकांनी केले आहे. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी, शस्त्रक्रिया करताना किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला जर संगीत ऐकविले, तर त्याच्या शारीरिक वेदना मोठय़ा प्रमाणात कमी होतात, असे या संशोधकांचे म्हणणे आहे.लंडनमधील क्वीन मेरी विद्यापीठाच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांनी ‘संगीत आणि विकार’ या विषयावर संशोधन केले. ‘‘एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याने संगीताचा आस्वाद घेतला, तर त्याची चिंता तर कमी होतेच, पण वेदनांपासूनही त्याला आराम मिळतो. संगीत हे संवेदनाहारी असल्याने रुग्णांसाठी ते फारच परिणामकारक आहे,’’ असे मत या डॉक्टरांनी मांडले.डॉ. कॅथरिन मेड्स यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने हे संशोधन केले आहे. ‘‘आम्ही आमच्या रुग्णालयातील डॉक्टरांना नेहमी सांगतो, रुग्णांना संगीत साधने रुग्णालयात आणण्याची परवानगी द्यावी. रुग्णांनाही ‘औषध’ म्हणून नियमित संगीत ऐकण्याचा सल्लाही आम्ही देतो,’’ असे डॉ. मेड्स यांनी सांगितले. डॉक्टरांच्या या पथकाने शस्त्रक्रिया झालेल्या सात हजार रुग्णांचा अभ्यास केला.या रुग्णांना अन्य उपचारांबरोबर नियमित संगीत ऐकविण्यात येत होते. मात्र इतर उपचारांपेक्षा त्यांच्या वेदना आणि मानसिक तणाव शमविण्यासाठी संगीताचा फार उपयोग झाला, असे डॉ. मेड्स सांगतात.

स्वस्त, सुरक्षित
संगीत ही स्वस्त, सुरक्षित आणि दुष्परिणाम नसलेली उपचार पद्धती आहे. एप्रिल महिन्यात एका रुग्णाच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णाला ‘पिंग फ्लॉइड’ बँडचे संगीत ऐकण्याची आवड होती. त्याला या बँडचे ‘डार्क साइड ऑफ दी मून’ या अल्बममधील गाणी ऐकविण्यात आली. त्याला या संगीतामुळे वेदनांपासून त्वरित आराम मिळाला, असे डॉ. मेड्स यांनी सांगितले. प्रसूत झालेल्या अनेक महिलांच्या बेडजवळ  प्लेलिस्ट आणि स्पीकर ठेवण्यात आले होते, जेणेकरून त्या आपले आवडते संगीत ऐकू शकतील आणि त्यातून आनंद घेतील, अशी माहिती डॉ. मेड्स यांनी दिली.