पनामा पेपर्समधील ताजी माहिती
पनामा पेपर्समधील ताज्या माहितीनुसार शेकडो भारतीयांची नावे ब्रिटिश व्हर्जिन आयलंडस म्हणजे बीव्हीआय येथे गुंतवणूक करणाऱ्यात समाविष्ट आहेत, असे चौकशीकर्त्यांनी म्हटले आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सरकारने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या नेतृत्वाखाली बहुसंस्थात्मक चौकशी गट स्थापन केला आहे. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार बीव्हीआयशी संबंधित अनेक प्रकरणे आहेत. त्यामुळे कर माहिती विनिमय करारानुसार संबंधित देशांना माहिती विचारली जाणार आहे.
बीव्हीआयला विशेष करून माहिती विचारली जाणार असून हे उत्तर कॅरेबियातील बेट आहे. तेथे अनेकांनी काळा पैसा ठेवला असून बेनामी कंपन्या सुरू केल्याचे दाखवले आहे. प्राप्तिकर खाते, सक्तवसुली संचालनालय व सीबीआय या संस्थाही चौकशीत सहभागी आहेत. पनामा पेपर्समध्ये अनेक भारतीयांची नावे असून त्यांनी या गुंतवणुका करविवरणपत्रात जाहीर केलेल्या आहेत. अनेकांनी त्या केलेल्या नाहीत त्यांची चौकशी प्राप्तीकर खाते करीत आहे.
आता नवीन डाटाबेसनुसार २२ कंपन्या व १०४६ व्यक्ती, ४२ मध्यस्थ व ८२८ पत्ते अशी माहिती आढळून आली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई हे शहरी भाग तसेच हरयाणातील सिरसा, बिहारमधील मुझफ्फरपूर, मध्यप्रदेशातील मंदसौर, भोपाळ व ईशान्येकडील राज्ये येथील काहींची खाती व कंपन्या यात असल्याची प्राथमिक माहिती आहे. द इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टस या संस्थेने नेवाडा ते हाँगकाँग तसेच ब्रिटिश व्हर्जिन आयलंड ही न्यायक्षेत्रे असलेल्या भागातील २१४००० आस्थापनांची नावे उघड केली आहेत. पनामातील मोझ्ॉक फोन्सेका कंपनीने प्रतिष्ठित व्यक्तींना परदेशात बेनामी खाती व कंपन्या सुरू करण्यास कायदेशीर सल्ला पातळीवर मदत केली होती.