ऑनर किलिंगच्या घटनेने पाकिस्तान पुन्हा एकदा हादरले आहे. चार मुलांची आई असलेल्या बहिणीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन भावाने तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. प्रतिष्ठेपायीच त्याने बहिणीची हत्या केल्याचा दावा केला जात आहे.

पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये गोपांग गावात राहणा-या एका महिलेची तिच्या भावाने हत्या केली. बहिणीचे एका स्थानिकासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याच्या मनात होता. या अनैतिक संबंधामुळे समाजात नाचक्की होईल असे त्याला वाटत होते. याच संशयातून त्याने गुरुवारी राहत्या घरीच बहिणीची हत्या केली. हत्येनंतर पोलसांनी महिलेचा भाऊ गुलाम हुसैन गोपांगला अटक केली आहे. महिलेचा पती या घटनेच्यावेळी कुठे होता हे अद्याप समजू शकलेले नाही.

काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानमध्ये मॉडेल कंदील बलोचची हत्या करण्यात आली होती. ही घटनाही ऑनर किलिंगचा प्रकार होती. कंदीलची तिचा भाऊ वासीमने ऑनर किलिंगच्या नावाखाली हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. या हत्येची कबुली वासीमने दिली होती, बहिणीची हत्या केल्याचा आपल्याला पश्चात्ताप होत नसून अभिमानच वाटतो, असे त्याने म्हटले होते. पाकिस्तानमध्ये दरवर्षी शेकडो महिलांची प्रतिष्ठेपायी हत्या केली जाते.