काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं लग्न न झाल्यानेच त्यांच्या बहिणीला म्हणजेच प्रियंका गांधींना राजकारणात यावं लागलं आहे अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. गुजरात येथील गोध्रा या ठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा जन्मापासूनच आरक्षित आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवरही बोट ठेवलं आहे.
काँग्रेसमधला सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान व्हायचं स्वप्न उराशी बाळगू शकतो का? असाही प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला. भाजपात घराणेशाही नाही, एक चहावाला माणूस पंतप्रधान होऊ शकतो. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो. भाजपात पदं मिळण्यासाठी कोणत्या तरी खास कुटुंबात तुमचा जन्म झाला पाहिजे अशी अट नाही असेही अमित शाह यांनी काँग्रेसला सुनावले आहे.
लोकसभा निवडणुकांचे घोडामैदान जवळ आले आहे. ही लढाई पुन्हा एकदा नमो VS रागा अशीच आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची किंवा कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत असेच दिसून येते आहे. एकीकडे राहुल गांधी राफेल करारावरून मोदी सरकारवर शरसंधान करत आहेत. तर दुसरीकडे प्रियंका गांधी यांच्या राजकारणातल्या प्रवेशावरून भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 8:16 pm