बोस्टन मॅरेथॉन बॉम्बस्फोट प्रकरणातील एका संशयित पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाल्याचे वृत्त असून पांढऱ्या रंगाची टोपी परिधान केलेल्या दुसऱ्या अतिरेक्याचा शोध सुरू असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मॅसॅच्युसेट तंत्र संस्थेच्या (एमआयटी) संकुलात दोघा संशयितांसमवेत झालेल्या चकमकीत संस्थेत तैनात करण्यात आलेला पोलीस अधिकारी ठार झाला.
बोस्टनपासून नजीकच असलेल्या वॉटरटाऊनमध्ये पोलिसांनी पांढऱ्या रंगाची टोपी परिधान केलेल्या दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू केला आहे. सदर संशयित बोस्टन मॅरेथॉन बॉम्बस्फोटाशी संबंधित आहे. एका संशयिताला ठार करण्यात आले असून दुसरा पसार झाला, असे पोलीस अधिकारी टिमोथी अल्बेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
एफबीआयने गुरुवारी काही छायाचित्रे जारी केली असून त्यामध्ये पांढऱ्या रंगाची टोपी परिधान केलेली एक व्यक्ती दिसत असून तोच बोस्टन बॉम्बस्फोटातील दुसरा संशयित असल्याचे अल्बेन यांचे म्हणणे आहे. त्यापूर्वी एफबीआयने दोघा संशयितांची छायाचित्रे जारी केली. या संशयितांना हुडकून काढण्यासाठी जनतेची मदत व्हावी या उद्देशाने ही छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत.
तपकिरी रंगाचे कुरळे केस आणि गौरवर्णीय पुरुषाचे छायाचित्र जारी करण्यात आले असून तोच दुसरा संशयित आहे. पहिला संशयित चकमकीत ठार झाला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सदर संशयित दहशतवादी असण्याची शक्यता शहराचे पोलीस आयुक्त एडवर्ड डेव्हिस यांनी व्यक्त केली आहे. वॉटरटाऊनमधील नागरिकांना पोलिसांनी दक्षतेचा इशारा दिला आहे. जनतेने घरातून बाहेर पडू नये आणि गणवेशातील पोलीस असल्याची खात्री केल्याशिवाय घराचा दरवाजा उघडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, मॅसॅच्युसेट तंत्र संस्थेच्या संकुलात करण्यात आलेल्या गोळीबारात एक पोलीस अधिकारी ठार झाल्याचे वृत्त आहे. दोघा जणांनी बंदुकीचा धाक दाखवून एक गाडी पळविली आणि वॉटरटाऊन शहराकडे ती नेली. पोलिसांच्या गाडय़ांमधून या गाडीचा पाठलाग करण्यात आला त्या वेळी एका संशयिताने गोळीबार केला. तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक संशयित ठार झाला. दुसऱ्या संशयिताचा कसून शोध घेतला जात आहे.

संशयित चेचेन
बोस्टन बॉम्बस्फोटाप्रकरणी संशयित असलेले दोघे मूळचे चेचेन येथील असल्याचे एनबीसी न्यूजने म्हटले आहे. शोध सुरू असलेला संशयिताची ओळख पटली असून त्याचे नाव झोखर सारनेव असे आहे. याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके मॅसेच्युसेट्स येथे सक्रिय झाली असून, त्याचा कसून शोध घेतला जात आहे. सुमारे ९ हजार पोलिसांचे पथक या शोधामध्ये कार्यरत झाले आहे.