आर्थिक संकटाला कंटाळून दोन सख्य़ा भावांनी आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. दिल्लीमधील चांदनी चौक येथे त्यांचं ज्लेलरीचं दुकान होतं. दुकानात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे मृतदेह आढळले. घटनास्थळी सुसाइड नोट सापडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, दुकानाच्या तिसऱ्या माळ्यावर दोन्ही भावांचे मृतदेह आढळले. दोघांनी आत्महत्या केली तेव्हा वडील पहिल्या माळ्यावर होते अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका भारद्वाज यांनी दिली आहे. अर्पित (४२) आणि अंकित (४७) अशी मृतांची नावं आहेत. दिल्लीमधील बाजार सीताराम परिसरात आपल्या कुटुंबासोबत ते राहत होते.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दोन्ही भावांनी आर्थिक चणचण निर्माण झाल्याने टोकाचं पाऊल उचलत असल्याचं सांगत कुटुंबाची माफी मागितली आहे. स्थानिकांनी मात्र दोघेही कर्ज फेडू शकत नसल्याने त्यांना त्रास दिला जात असल्याचा दावा केला आहे. लॉकडाउनमुळे दोघे भाऊ कर्ज फेडण्यात असमर्थ होते असंही स्थानिकांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी मात्र आरोप पडताळून पाहत असल्याचं सांगितलं आहे. कारण सुसाइड नोटमध्ये दोघांनी कोणाचाही उल्लेख केलेला नाही. “आम्ही कुटुंबीयांचे जबाब नोंदवत असून तपास सुरु आहे,” असं मोनिका भारद्वाज यांनी सांगितलं आहे. मोठ्या भावाचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलं आहेत. तर छोटा भाऊ अविवाहित होता अशी माहिती त्यांनी दिली आहे.