बेल्जियममधील ब्रसेल्स येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकून पडलेले २४२ भारतीय व २८ कर्मचारी यांना घेऊन जेट एअरवेजचे विमान आज सकाळी येथे उतरले. अ‍ॅमस्टरडॅम येथून आलेल्या या विमानातून भारतीयांना परत आणण्यात आले आहे. थेट मुंबईला येणाऱ्या विमानाचे उड्डाण तांत्रिक कारणास्तव रद्द झाले. एकूण २१४ पैकी ६९ प्रवासी हे मुंबईचे असून, जेट एअरवेजच्या २८ कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश आहे.
पहाटे ५.१० वाजता हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. एका प्रवासी महिलेने सांगितले, की मी टोरांटोहून आले आहे. ब्रसेल्स येथे ज्या घटनांना सामोरे जावे लागले त्या कठीण होत्या.
ब्रसेल्समध्ये लोक शोकसागरात बुडालेले आहेत. ब्रसेल्सच्या विमानतळावर आम्हाला पंधरा मिनिटांत सज्ज होण्यास सांगण्यात आले. अनेक प्रवासी तर सामान टाकून पळाले. त्यानंतर तीन स्फोट झालेले आम्ही पाहिले. पहिला स्फोट निर्गमन भागात झाला त्या वेळी आमचे विमान तेथे उतरत होते. त्यानंतर त्यांनी आम्हाला बाहेर काढले. काही काळ आम्ही विमानतळावर अडकून
पडलो.
जेट एअरवेजने गुरुवारी दोन विमाने अ‍ॅमस्टरडॅमहून टोरांटो व तेथून दिल्ली या मार्गाने पाठवली. ब्रसेल्समध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात आली. सुरुवातील तीन विमान उड्डाणे अ‍ॅमस्टरडॅमहून करण्याचे ठरले होते. त्यात एक थेट मुंबईला येणारे विमान होते, पण मुंबईचे विमान तांत्रिक बिघाडाने रद्द करण्यात आले. त्यामुळे सरतेशेवटी हे विमान दिल्लीत आले व तेथून ६९ प्रवासी नंतर मुंबईला रवाना झाले.
एका प्रवाशाने सांगितले, की ब्रसेल्स येथे विमानतळावर जात असताना स्फोट झाला, त्यामुळे आम्हाला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. मंगळवारी ब्रसेल्स येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३१ ठार तर ३०० जण जखमी झाले होते, तर २४२ प्रवासी व २८ कर्मचारी असे भारतीय लोक तेथे अडकून पडले होते.