भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी गुरूवारी सकाळी ९ वाजता राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. कडक सुरक्षा व्यवस्थेत हा शपथविधी पार पडला. येडियुरप्पांनी कन्नडमध्ये शपथ घेतली. त्यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा घेतली आहे. सध्या त्यांनी एकट्यानेच शपथ घेतली असून बहुमत सिद्ध केल्यानंतर इतर मंत्र्यांना शपथ दिली जाईल.

शपथ घेतल्यानंतर येडियुरप्पा हे विधानसभा परिसरात पोहोचले. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्यासह पक्षाचे अनेक नेते त्यांच्याबरोबर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संसदेच्या पायरीसमोर नतमस्तक होऊन प्रवेश केला होता. अगदी तसेच येडियुरप्पा हेही विधानसभेच्या पायरीसमोर नतमस्तक झाले आणि विधानसभेत प्रवेश केला.

तत्पूर्वी राजभवनात शपथविधीला जाण्यापूर्वी येडियुरप्पांनी राधा-कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राजभवनात पोहोचताच त्यांनी भाजपा नेते आणि राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांबरोबर चर्चा केली. राजभवनाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मोदी-मोदी आणि वंदे मातरमचा गजर कार्यकर्त्यांकडून सुरू होता. दरम्यान, राज्यपालांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे.

तत्पूर्वी, मध्यरात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांचा शपथविधी रोखण्यास नकार दिला. याप्रश्नी शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.