नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त  झालेल्या उत्तराखंडला उभारण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. येथे मदतकार्य करणाऱ्या सीमा सुरक्षा दलानेही पुढाकार घेऊन उत्तराखंडमधील ११ गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुरामुळे उत्तराखंडचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या वतीने केवळ बचाव मोहीमच राबविण्यात आलेली नाही, तर येथील जनजीवन सुरळीत करण्याच्या दृष्टीने रस्ते, पूल उभारण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. शिवाय कालिमठ खोऱ्यातील पूरग्रस्त गावांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यावरही भर दिला आहे.
सीमा सुरक्षा दलाने उत्तराखंडमधील कालिमठ, कविलथा, कोटमा, सिन्स्यू, चिलोंद, कुलझेथी, खेन्नी, जलताला, चौमासी आणि भुयंकी आदी काळी नदीच्या काठाजवळील गावे दत्तक घेतली आहेत. स्थानिक नागरिकांना मदत करण्यासाठी तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. शिवाय  रस्ते आणि पूल नष्ट झाल्यामुळे त्यांच्या उभारणीसाठी अभियंत्यांची विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे. सीमा सुररक्षा दलाचे जवान येथील कालिमठ मंदिराच्या उभारणीसाठीही मदत करणार आहेत. ही पथके आणखी काही काळ उत्तराखंडमध्ये राहणार असल्याचे  अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अर्धलष्करी दलाच्या जवानांनीही आपल्या एक दिवसाच्या पगाराची सुमारे १६ कोटी रुपये रक्कम उत्तराखंडमधील पीडितांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.