दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलेल्या सीमा सुरक्षा दलाचे(बीएसएफ) चार्टड विमान कोसळून झालेल्या अपघातात वैमानिकासह १० जवान ठार झाले आहेत. बीएसएफच्या सुपर किंग या चार्टड विमानाने सकाळी दहाच्या सुमारास दिल्ली विमानतळावरून उड्डाण केले. मात्र, विमानतळापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या द्वारका सेक्टर आठ मधील बारडोलाजवळ विमान अपघातग्रस्त झाले.  एका भिंतीवर जाऊन ते आदळले आणि त्यानंतर लागलेल्या आगीत संपूर्ण विमान जळून खाक झाले. मृत्यू झालेल्या दहा जणांमध्ये तीन जण हे बीएसएफचे अधिकारी असून उर्वरित सात जण बीएसएफचे अभियंते होते.
दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे विमान खाली कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या १९ गाड्या दाखल झाल्या असून बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली, तर केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.