लपून गोळीबार करण्यासह जम्मू- काश्मीरमधील शस्त्रसंधी भंगाच्या घटना, घुसखोरी, कच्छच्या रणमधील अतिक्रमण यांसारखे महत्त्वाचे मुद्दे ९ सप्टेंबरपासून पाकिस्तानसोबत होणाऱ्या पाच दिवसांच्या सीमा सुरक्षा दलांच्या महासंचालक स्तरीय बोलण्यांमध्ये भारत उपस्थित करण्याची अपेक्षा आहे.
पाकिस्तानी रेंजर्सचे महासंचालक (पंजाब) मेजर जनरल उमर फारुक बुर्की यांच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यांचे शिष्टमंडळ ८ तारखेला अटारी-वाघा सीमेवरून भारतात प्रवेश करेल आणि ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान सीमा सुरक्षा दलासोबत होणाऱ्या बोलण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अमृतसरहून नवी दिल्लीला येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सिंधचे महासंचालक शिष्टमंडळात नसणार आहेत.
भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख देवेंद्र कुमार पाठक करतील. भारताने ठरवलेल्या विषयपत्रिकेत शस्त्रसंधी भंगाच्या ‘सगळ्यात महत्त्वाच्या’ मुद्दय़ावर जादा भर देण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 7, 2015 2:27 am