सीमा रेषा ओलांडून भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ताब्यात घेतले आहे. अब्दुल्ला शाह असे या तरुणाचे नाव असून वाघा बॉर्डरवरुन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून मोबाईल फोन आणि पाकिस्तानच्या चलनातील ९ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.

‘एएनआय’वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार बीएसएफने गुरुवारी वाघा बॉर्डरवरुन २१ वर्षीय पाकिस्तानी तरुणाला अटक केली. सीमा रेषा ओलांडून तो भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होता. चौकशीदरम्यान या तरुणाचे नाव समोर आले. अब्दुल्ला शाह असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानच्या स्वात भागात राहतो. तो भारतात का आला होता याची चौकशी सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अब्दुल्लाकडे पाकिस्तानचा पासपोर्ट सापडला आहे. पण भारतात प्रवेश करण्याचा व्हिसा त्याच्याकडे नाही.

दुसरीकडे, पंजाबमधील अमृतसर येथील रनिया येथे सीमा सुरक्षा दलाने दोन भारतीय तरुणांना अटक केली आहे. ताहिब (वय २० वर्ष) आणि बाबू अली (वय २३ वर्ष) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही पाकिस्तानमध्ये जात असताना जवानांनी त्यांना पकडले. ते पाकमध्ये का जात होते याची चौकशी सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी सकाळी बंगळुरुमधूनही तीन पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे भारतातील प्रवेश आणि वास्तव्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे नव्हती.

गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून पाकिस्तानमधून घुसखोरीचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सीमा रेषेवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे.