सीमारेषा पार करुन पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या २१ वर्षीय तरुणील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी ताब्यात घेतलं आहे. गुजरातच्या कच्छमधून तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून हा तरुण पायी चालत पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत होता. झिशान सिद्दीकी असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा उस्मानाबादचा आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या पाकिस्तानमधील तरुणीला भेटण्यासाठी चालला होता. “बीएसफने तरुणाला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. तरुण उस्मानाबादचा रहिवासी आहे,” अशी माहिती कच्छ-पूर्व पोलिस अधीक्षक परिक्षीत राठोड यांनी दिली आहे.

“गुरुवारी रात्री महाराष्ट्राचा रजिस्ट्रेशन क्रमांक असणारी एक दुचाकी बेवारस सापडल्यानंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला होता. यानंतर बीएसफला एक तरुण पायी चालत सीमारेषेच्या दिशेने जात असल्याचं निदर्शनास आलं. यावेळी त्याला लगेच अडवून ताब्यात घेण्यात आलं,” अशी माहिती राठोड यांनी दिली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झिशान सिद्दीकी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून दुचाकीवरुन प्रवास करत उस्मानाबाद येथून गुजरातला पोहोचला होता. दुचाकी वाळूत अडकल्यानंत त्याने चालत सीमारेषा पार करत पाकिस्तानाता जाऊन सोशल मीडियावर मैत्री झालेल्या तरुणीची भेट घेण्याचं ठरवलं. पण बीएसएफने वेळीच कारवाई केली आणि त्याला ताब्यात घेत पोलिसांकडे सोपवलं.