एका महिलेच्या बॅगमधून सोने आणि हिरे चोरण्याच्या आरोपाखाली एका बीएसएफच्या जवानाला अटक करण्यात आली आहे. बुधवारी दिल्ली विमानतळावर ही घटना घडली. या दागिन्यांची किंमत 15 लाख रूपये असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या बीएसएफ जवानाचे नाव नरेश कुमार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तसेच त्यांनी आपला गुन्हा कबुल केल्याचेही पोलिसांनी सांगितले. चौकशीदरम्यान, त्यांनी आपल्याला बागडोगरामध्ये बदली हवी असल्याचे सांगत, त्यासाठीच झटपट पैसे कमवण्यासाठी हा प्रकार केल्याची माहिती दिली. संबंधित महिला दिल्ली विमानतळावरून श्रीनगरला जाताना आपल्या पतीची वाट पाहत असताना संबंधित जवानाने ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रार मिळताच सीआयएसएफ आणि दिल्ली पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरूवात केली. तसेच यावेळी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. यादरम्यान, नरेश कुमार यांनी महिलेच्या सीटखालून त्यांची बॅग उचलत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांचे उपायुक्त संजय भाटीया यांनी दिली.

दरम्यान, त्यांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. बागडोगरासाठी विमान पकडण्यासाठी जात असताना नरेश कुमार यांना अटक करण्यात आली. सुरूवातीला त्यांची चोरी केल्याचे नाकारले. परंतु तपासादरम्यान त्यांच्याकडे बॅगेव्यतिरिक्त सोने आणि हिऱ्याचे दागिने आढळून आल्याचेही भाटीया म्हणाले. नरेश कुमार यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.