ईशान्य दिल्लीतील हिंसाचारामुळे अनेक मुस्लीम कुटुंब भीतीपोटी आपल्या घरांमध्ये लपून बसली होती. यामधील एक कुटुंब मोहम्मह अनीस यांचंही होतं. खजुरी खास परिसरात २५ फेब्रुवारी रोजी आंदोलक तोडफोड आणि घरांची जाळपोळ करत होते. आपल्या दोन मजली घराबाहेर असलेली नावाची पाटी पाहून आंदोलक थांबतील अशी अपेक्षा कुटुंबाला होती. तशी प्रार्थनाही ते करत होते. घराबाहेर असलेल्या नावाच्या पाटीवर हे घर बीएसएफ जवान मोहम्मद अनीस यांचं असल्याचा उल्लेख होता. पण ही नावाची पाटी त्यांना हिंसाचारापासून वाचवू शकली नाही. आंदोलकांनी आधी त्यांच्या घराबाहेर उभ्या असणाऱ्या गाड्या जाळल्या. यानंतर काही मिनिटं त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली.

यावेळी आंदोलक ‘इकडे ये पाकिस्तानी, तुला नागरिकत्व देतो’ अशा घोषणा देत होते. आंदोलकांना घर जाळण्यासाठी एक गॅस सिलेंडर आतमध्ये फेकला. अनीस २०१३ मध्ये बीएसएफमध्ये भर्ती झाले असून तीन वर्ष त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत सीमेचं रक्षण केलं आहे.

आंदोलक जेव्हा घराबाहेर हिंसाचार करत होते तेव्हा अनीस, वडील मोमम्मद मुनीस, काका मोहम्मद अहमद आणि १८ वर्षीय चुलत बहीण नेहा परवनी घरात होते. काहीतरी भीषण होणार असल्याचं लक्षात येताच त्यांनी घरातून पळ काढला. निमलष्करी दलाने मदत करत त्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं.

जिथे घर उभं होतं त्या ठिकाणी आता फक्त राख शिल्लक आहे. परिसरातील एकूण ३५ घरं जाळण्यात आली. फक्त एका मुस्लीम कुटुंबाचं घर या हिंसाचारातून वाचलं. अनीस यांच्या कुटुंबाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. कारण त्यांनी आपली आयुष्यभराची कमाई घरात ठेवली होती. पुढील तीन महिन्यात त्यांच्या घरात दोन लग्न पार पडणार होती.

नेहा परवीनचं एप्रिल आणि अनीस यांचं मे महिन्यात लग्न होणार होते. घरात ठेवलेले सर्व दागिने गायब झाले आहेत असं कुटुंबाने सांगितलं आहे. आम्ही शक्य होईल त्याप्रमाणे पैसे गोळा करत दागिन्यांची खरेदी करत होतो. लग्नाच्या तयारीसाठी तीन लाखांची रोख रक्कम घऱात ठेवली होती अशी माहिती कुटुंबाने दिली आहे.

खजुरी खास परिसरात हिंदूंची संख्या जास्त आहे. पण अनीस यांच्या कुटुंबाने हल्ला किंवा चोरीत कोणत्याही शेजाऱ्याचा समावेश नव्हता असं सांगितलं आहे. बाहेरुन लोक आले होते. शेजारी राहणारे हिंदू यांना निघून जाण्यास सांगत होते. तसंच वाहनांना लावलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत होते असं त्यांनी सांगितलं आहे.