आंतरराष्ट्रीय सीमेनजीक पाकिस्तानी रेंजर्सकडून करण्यात आलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान गंभीररित्या जखमी झाला आहे. पुरा सेक्टरमधील अरनिया भागात हा प्रकार घडला. गुप्तचर यंत्रणांनी याबाबत माहिती दिली आहे.

के. के. अप्पाराव असे जखमी झालेल्या जवानाचे नाव असून ते बीएसएफच्या ९२व्या बटालियनचे कॉन्स्टेबल आहेत. नुकतीच या भागात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दुपारी सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात त्यांच्या डोक्याला गोळी चाटून गेली. या घटनेनंतर अप्पाराव यांना तातडीने जम्मूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर बीएसएफचे महानिऱीक्षक राम अवतार आणि उपमहानिरिक्षक धर्मेंद्र पारिख यांनी घटनस्थळाला भेट दिली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सीमेवरील इतरही अनेक सेक्टरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. गुरुवारीच गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांबा सेक्टरमधील रामगढ भागातील एका बॉर्डर पोस्टला भेट दिली होती.

विशेष म्हणजे, १७ जुलै रोजी सांबा सेक्टरमध्ये बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यामध्ये कमांडंट पातळीवर फ्लॅग मिटिंग पार पडली होती. यावेळी त्यांच्यामध्ये या भागात शांतता राखण्याबाबत बांधील असल्याचे निश्चित झाले होते. मात्र, तरीही आज पाकिस्तानकडून गोळीबार झाल्याने या शांततेबाबतच्या चर्चेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

[jwplayer Ol90bGDc]