सीमेवरील जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याची तक्रार थेट समाजमाध्यमांवरून करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तेजबहादूर यादव या जवानाचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज बीएसएफकडून फेटाळण्यात आला आहे. गैरवर्तन केल्याबद्दल सध्या त्याची चौकशी सुरू असल्यामुळे तेजबहादूरला व्हीआरएस नाकारण्यात आल्याचे कारण बीएसएफकडून देण्यात आले आहे. मात्र, तेजबहादूरची पत्नी शर्मिला यादव हिने तिच्या पतीला अटक करण्यात आल्याचा दावा केला आहे. शर्मिला यादव हिने ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, तेजबहादूर ३१ जानेवारीला घरी येणार होता. मात्र, ते घरी आले नाहीत. याशिवाय, सोशल मीडियावरील सर्व प्रकारानंतर आपल्याला निवृत्ती स्विकारण्यासाठी सांगण्यात आल्याचे तेजबहादूरने शर्मिला यादव यांना सांगितले होते. मात्र, काहीवेळातच हा निर्णय रद्द करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू असल्याची माहिती आपल्याला व्यक्तीने दिल्याचे शर्मिला यांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलातील तेज बहादूर यादव या जवानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तेज बहादूरने जवानांना मिळणा-या जेवणाचा दर्जा सुमार असल्याचे म्हटले होते. केंद्र सरकारकडून देशभक्तीचे दाखले दिले जात असताना जवानांना मिळणा-या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले होते.

दरम्यान, बीएसएफने यादवला अटक करण्यात आल्याचे वृत्त फेटाळले. केवळ त्यांची चौकशी सुरू असून त्याचा अंतिम निकाल बाकी असल्यामुळे तेजबहादूरचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज फेटाळण्यात आला. तेजबहादूरला ३० जानेवारीला त्याचा स्वेच्छानिवृत्ती फेटाळण्यात आल्याचे कळविण्यात आल्याचे बीएसएफने सांगितले. तेजबहादूररने समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या ध्वनिचित्रफितीमुळे निमलष्करी दलातील जवानांच्या समस्यांचा मुद्दा चर्चेत आला होता. तेजबहादूर यांच्या ध्वनिचित्रफितीची आता चौकशी सुरू असून तपासादरम्यान त्यांच्यावर दबाव येऊ नये यासाठी त्यांची अन्यत्र बदली करण्यात आली असल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अशाप्रकारच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी व्हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता.