गस्तीवर असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी हरामी नाल्यातून दोन पाकिस्तानी बोटी जप्त केल्या. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळ हरामी नाला आहे. जप्त केलेल्या दोन्ही बोटी मासेमारीच्या असून त्या सोडून देण्यात आलेल्या होत्या. या दोन बोटी सापडल्यानंतर या भागात बीएसएफने मोठया प्रमाणात शोध मोहिम सुरु केली आहे. पण अजूनपर्यंत काहीही संशयास्पद सापडलेले नाही.

शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास गस्तीवर असणाऱ्या बीएसएफने हरामी नाल्यातून सिंगल इंजिन असलेल्या दोन पाकिस्तानी बोटी जप्त केल्या. यावर्षी मे महिन्यात बीएसएफने याच भागात एक पाकिस्तानी बोट पकडली होती. पण त्यावरील मच्छीमार निसटण्यात यशस्वी ठरले होते.