जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यापासून चिडलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने भारतविरोधी कुरापती केल्या जात आहेत. सोमवारी रात्री उशीरा सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाकिस्तानचा एक डाव हाणून पाडला. पाकिस्तानकडून सीमारेषेवर भारतीय हद्दीतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी एक ड्रोन पाठवण्यात आले होते, जे बीएसएफच्या जवानांनी पाडले.

या अगोदर देखीप पाकिस्तानकडून भारतीय हद्दीतील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी ड्रोन पाठवण्यात आले होते. या संदर्भात पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार जम्मूमधील अरनिया सेक्टरमधील सीमारेषेजवळ सोमवारी रात्री उशीरा भारतीय हद्दीतील हालचालींची पाहणी करणारे एक ड्रोन आढळले होते. जे बीएसएफच्या जवानांनी पाडले. बीएसएफ जम्मू फ्रंटीयरचे आयजी एनएस जमवाल यांनी ही माहिती दिली. याप्रकरणी आणखी तपास सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानकडून मागील काही महिन्यांपासून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. शिवाय, जम्मू-काश्मीरमधील वातावरण बिघडवण्याच्यादृष्टीने दहशतवादी कारवायांना पाठबळ देखील दिले जात आहे. याचबरोबर अनेक दहशतवादी संघटना देखील भारतविरोधी कारवाया करण्यासाठी अधिकच सक्रीय झालेल्या दिसत आहेत.