गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. भारताकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जाते. असाच प्रकार पुन्हा घडला आणि पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार करण्यात आला. यावेळी मात्र सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दिलेल्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानची चांगलीच दाणादाण उडाली. अखेर पाक रेंजर्सने फोन करून बीएसएफला गोळीबार बंद करून शांतता राखण्याचे आवाहन केले. पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवानासह पाच नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर बीएसएफने प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली होती. बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेनजीक असलेल्या पाकिस्तानी चौकीलाच उडवून दिले.

बीएसएफने रविवारी याबाबत माहिती दिली. तसेच १९ मिनिटांचे एक फुटेजही जारी केले आहे. यात पाकिस्तानची एक चौकी नष्ट होताना दिसते. बीएसएफच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सनी रविवारी (दि. २० मे) फोन करून बीएसएफला गोळीबार रोखण्याची विनंती केली. भारताच्या त्वरीत आणि चोख प्रत्युत्तरामुळे धास्तावलेल्या पाक रेंजर्सला फोन करावा लागला. पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबाराला बीएसएफकडून मागील तीन दिवसांपासून योग्य प्रत्युत्तर दिले जात आहे. नेमक्या ठिकाणी गोळीबार केला जात असल्यामुळे पाकिस्तानी रेंजर्सचे मोठे नुकसान होत होते.

या गोळीबारात बीएसएफचे दोन जवानही शहीद झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ दिसून आली होती. या गोळीबारात अनेक नागरिकही मारले गेल्याचे आणि जायबंदी झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात गोळीबाराच्या ७०० हून अधिक घटना घडल्याचे सांगण्यात येते. यामध्ये १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ३८ लोक जखमी झाले आहेत. बीएसएफमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मूमधील आरएस पुरा, बिश्नाह, अरनिया आदी भागात गुरूवारी रात्री एक वाजेपासून गोळीबार सुरू केला होता. यामध्ये जबोवल सीमा चौकीत तैनात असलेला एक जवान शहीद झाला होता. दुसऱ्या दिवशी लष्कराने कुपवाड येथील ब्रिंजाल परिसरात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.