दररोज नियंत्रण रेषेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनी चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय जवानांसह नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला आता भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारतीय सैन्याचा हा प्रतिहल्ला इतका जबरदस्त आहे की, पाकिस्तानी सैन्यावर गुडघे टेकण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच मागील आठवड्यात पाकिस्तानकडून दोनवेळा शस्त्रसंधी करुन गोळीबार रोखण्याची विनंती करण्यात आली. भारताच्या ‘ऑपरेशन अर्जुन’मुळे पाकिस्तान अक्षरश: बेजार झाला आहे.

पाकिस्तानकडून अनेकदा सीमेवरील सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जाते. पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतीला प्रत्युत्तर म्हणून सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ‘ऑपरेशन अर्जुन’ सुरु केले आहे. बीएसएफने पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील आजी माजी सैनिकांच्या घरांना आणि शेतांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्याच्या या जबरदस्त प्रतिहल्ल्यामुळे पाकिस्तानला गोळीबार थांबवण्याची विनंती करावी लागली. गेल्या महिन्यात भारतीय जवान आणि नागरिकांना मारण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने स्नायपर्सचा वापर केला होता. पाकिस्तानी सैन्याच्या याच कुरापतींना उत्तर देण्यासाठी ‘ऑपरेशन अर्जुन’ सुरु करण्यात आले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफने खासकरुन पाकिस्तानचे सैनिक, माजी सैनिक, पाकिस्तानी रेंजर्स आणि आयएसआयचे अधिकारी यांच्या निवासस्थानांना लक्ष्य केले. यांच्यामुळेच दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यात यशस्वी होतात. त्यामुळेच बीएसएफने या सगळ्यांच्या निवासस्थानांवर गोळीबार केला. भारताच्या प्रत्युतरानंतर पाकिस्तानी रेंजर्सचे पंजाब डीजी मेजर जनरल नवीद हायत खान यांनी बीएसएफचे संचालक के. के. शर्मा यांच्याकडे गोळीबार रोखण्याची विनंती केली. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात दोनवेळा पाकिस्तानकडून ही विनंती करण्यात आली. खान यांच्या विनंतीनंतर शर्मा यांनी पाकिस्तानकडून विनाकारण करण्यात येणाऱ्या गोळीबारावर नाराजी व्यक्त केली. खान यांनी २२ आणि २५ सप्टेंबरला गोळीबार रोखण्यासाठी विनंती केली होती.