भाजपाचे खासदार अनंक कुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांच्या निशाण्यावर भारत संचार निगम लिमिटेडचे (BSNL) कर्मचारी आहेत. “बीएसएनएलचे कर्मचारी हे गद्दार आहेत आणि ते कंपनीला पुढे नेण्यासाठी काम करू इच्छित नाहीत,” असं वक्तव्य हेगडे यांनी केलं आहे. तसंच त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकीही देऊन टाकली आहे. तसंच कंपनीच्या खासगीकरणानंतर ८८ हजार कामगारांना कामावरून कमी करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.

उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमथा येथे १० ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. “बीएसएनएलचे कर्मचारी गद्दार आहेत. तसंच ते आपल्या कंपनीच्या विकासासाठी काम करण्यास इच्छुक नाही. सरकार बीएसएनएलचं खासगीकरण करणार आहे. त्यामुळे ८८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे,” असं हेगडे यावेळी बोलताना म्हणाले.

“सरकारनं कामासाठी निधी दिला आहे. लोकांचा सेवेची आवश्यकता आहे आणि पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. परंतु ते काम करत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची घोषणा केली. त्यांनी निधी आणि तंत्रज्ञानही दिलं आहे. परंतु बीएसएनएलचे कर्मचारी काम करण्यास इच्छुक नाहीत,” असंही ते म्हणाले. यापूर्वी हेगडे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहे. त्यामुळे अनेकदा ते चर्चेतही आले होते. नुकतंच हेगडे यांनी महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मोठा वाद उफाळला होता. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न हे नाटक असल्याचं म्हटलं होतं.