लोकसभा निवडणुकांच्या आधी आणि त्यानंतर हर-हर मोदी घर-घर मोदी चा घोष करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये बेघर होता होता राहिले अशी टीका करत बसपाच्या नेत्या मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. बसपाच्या नेत्या मायावतींचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो आहे. याच वाढदिवसाच्या औचित्याने संवाद साधत असताना मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये १८ ते २० टक्के दलित मतदारांनी मते दिली असती तर भाजपला सत्ता गमवावी लागली असती. उना मध्ये झालेले हत्याकांडच भाजपची सत्ता घालवण्यासाठी पुरेसे होते असेही त्यांनी म्हटले आहे. भाजप सरकारला देशाची घटना आणि कायदा बदलून टाकायचा आहे असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी देशातले वातावरण बिघडवण्याचे काम केले. समाजातील प्रत्येक घटकाचे नुकसान या दोन्ही पक्षांनी केले आहे अशी टीकाही मायावती यांनी केली. देशातल्या प्रत्येक राज्यात आज जातीयवाद आणि धार्मिक तेढ पसरवण्याचे काम सुरु आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा एकमेव पक्ष देशात आहे तो म्हणजे बसपा. बसपा कधीच थैल्यांचे राजकारण करत नाही. आम्ही कायमच देशातील दलित, मागास, मुस्लिम आणि धार्मिक अल्पसंख्याकांना मदत केली आहे. यापुढेही करत राहू. काँग्रेस अँड कंपनीने आणि भाजप अँड कंपनीने बसपा संपवण्याचे प्रयत्न करून पाहिले मात्र त्यांना त्यात यश आले नाही येणारही नाही असेही मायावतींनी म्हटले आहे. ‘आजतक’ या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.

भाजप सरकारला आरक्षण काढून टाकायचे आहे आणि लोकांना बेरोजगार करायचे आहे. आमचा पक्ष समाजातल्या मागास वर्गांसाठी कायम कष्ट सोसत आला आहे. यापुढेही त्यांच्या कल्याणासाठी बसपा काम करेल. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोठी ईव्हीएम घोटाळा झाला, ज्यामुळे आमच्या पक्षाचे नुकसान झाले आहे असाही आरोप त्यांनी केला. राज्यसभेत मला बोलू दिले जात नव्हते म्हणून मी राजीनामा दिला असेही त्यांनी स्पष्ट केले.