बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत आज (रविवारी) राजधानीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मायावती यांनी बोलावलेल्या बैठकीत त्या नवीन व्यूहरचना ठरवण्याची शक्यता वर्तवली जाते. या बैठकीसाठी पक्षाचे महत्त्वाचे नेते, आमदार, विधान परिषद सदस्य, राज्यसभेचे सदस्य यांना निमंत्रण देण्यात आले आहे. समर्थकांमध्ये राजीनाम्यामागील उद्देश योग्य पद्धतीने पोहोचवण्यावरही त्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

गेल्या आठवड्यात मायावती यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उत्तर प्रदेशातील सहारनपूर प्रकरणात त्यांनी सभागृहात भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु दलितांबद्दल बोलू दिले जात नसल्याची तक्रार करून त्यांनी तत्काळ सभागृह सोडले होते. मला आता सभागृहात राहण्याचा काहीही अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, विधानसभेत बसपला केवळ १८ जागी विजय मिळाला होता, तर भाजपने ४०३ पैकी ३०० जागी विजय संपादन केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपची पाटी कोरी राहिली होती. दरम्यान, देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मायावती या काय भूमिका घेणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी ममता यांनी भाजपला भारतातून बाहेर काढण्याचे वक्तव्य केले होते.

राजीनामा दिल्यामुळे आता मायावती पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करू शकतील, असे पक्षाच्या एका नेत्याने म्हटले आहे.