डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात ‘रामजी’ हे त्यांच्या वडिलांचे नाव वापरण्याच्या सरकारच्या निर्णयावरून उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे. बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी यावरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘व्होट बँके’साठी सरकार बाबासाहेबांना ‘रामजी’ बनवण्याकडे लक्ष देत आहे. पण त्यांच्या जातीच्या लोकांसाठी काम करण्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मागास जाती आणि आदिवासींवर होत असलेल्या अत्याचाराकडे लक्ष देत नाही. त्यांना मतपेटीची चिंता लागली आहे. त्यासाठी त्यांचा संपूर्ण भर हा नाव बदलण्यावर असल्याची टीका त्यांनी केली.

रामजी हे बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव होते. उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेनंतर त्यांचे नावही समाविष्ट केले जाणार आहे. उत्तर प्रदेशात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव आंबेडकर असे लिहिले जात होते. आता त्यांच्या या नावात त्यांच्या वडिलांचे नावही समाविष्ट केले जाणार आहे.

यापूर्वीही मायावती यांनी भाजपावर टीका केली होती. निवडणुकीत फायदा घेण्यासाठी भाजपा हे नाटक करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांची काळजी करत. तर भाजपा त्यांच्या नावावर नाटक करत आहे. सवंग लोकप्रियतेसाठी बाबासाहेबांच्या नावात बदल केला जात आहे. बाबासाहेबांना माननाऱ्या लोकांवर अत्याचार केला जात असल्याचे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लिहिताना भीमराव रामजी आंबेडकर असेच लिहिले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेशातही ते तसेच घेतले जावे असे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या सरकारी दस्तावेजातही अशा प्रकारचे बदल केले जावेत असेही या आदेशात म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सही करताना ‘भीमराव रामजी आंबेडकर’ अशीच सही करत, त्यामुळे त्यांचे नाव तसेच लिहिले गेले पाहिजे असे राज्यपाल राम नाईक यांनी म्हटले आहे.